वाशिम जिल्ह्यात दुपारनंतर बाजारपेठेत शुकशुकाट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:37 PM2020-05-25T17:37:57+5:302020-05-25T17:38:13+5:30
वाशिमसह जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेत दुपारी ३ वाजतानंतर शुकशुकाट असल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नॉन रेड झोनमध्ये समावेश झाल्याने जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा आहे. परंतू, वाशिमसह जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेत दुपारी ३ वाजतानंतर शुकशुकाट असल्याचे दिसून येते. परराज्य, परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने मजूर, कामगार येत असून, दक्षता म्हणून अनेक व्यापारी दुपारी ३ वाजतानंतर दुकाने बंद ठेवत असल्याचे २५ मे रोजी दिसून आले.
वाशिम येथील पाटणी चौकस्थित बाजारपेठेत दुपारी २ वाजेपर्यंत विविध वस्तू व साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. त्यानंतर हळूहळू गर्दी ओसरत असल्याचे २५ मे रोजी दिसून आले. दुपारी ३ ते ३.३० वाजतानंतर पाटणी चौकस्थित बाजारपेठेतील अनेक दुकाने बंद करण्यात येतात. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येतो.
मालेगाव : राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला. दरम्यान, अर्थचक्र थोड्याफार प्रमाणात पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न म्हणून राज्य शासनाने राज्यात रेड झोन व नॉन रेड झोनच्या अनुषंगाने सुधारित मार्गदर्शक सूचना २१ मे रोजी जारी केल्या. त्यानुसार जिल्ह्यात २२ मेपासून ‘लॉकडाऊन’च्या सुधारित मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी सुरू झाली. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा असली तरी दुपारी २ वाजतानंतर मालेगाव येथील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. तापते ऊन आणि कोरोना संसर्गाचा धोका यामुळे व्यापारी दुपारनंतर दुकाने बंद ठेवत असल्याने बाजारपेठेत सामसूम दिसून आली.
केनवड : सकाळी ९ वाजतापासून केनवड येथील बसथांब्यावरील दुकानांमध्ये गर्दी दिसून येते. दुपारी २ ते ३ वाजतानंतर बहुतांश दुकाने बंद केली जातात. त्यामुळे दुपारनंतर शुकशुकाट दिसून येतो. २५ मे रोजीदेखील केनवड येथील बाजारपेठेत दुपारी ३ वाजतानंतर शुकशुकाट दिसून आला.
शिरपूर जैन : येथे २२ मे पासूनच दुपारी ३ वाजतानंतर सर्व बाजारपेठ बंद होत आहे. २५ मे रोजीदेखील शिरपूर येथील बाजारपेठेत दुपारी ३ वाजेनंतर सामसूम दिसून आली. शिरपूर परिसरात मोठ्या संख्येने परराज्य, परजिल्ह्यातून मजूर, कामगार येत आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा संभाव्य धोका नको ्म्हणून प्रत्येकजण दक्षता घेत असल्याचे शिरपूर परिसरात दिसून येते.