वय वर्षे १०१.. सीटी स्कोर १२; आजीबाईची कोरोनावर मात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:44 AM2021-05-20T04:44:37+5:302021-05-20T04:44:37+5:30
विवेकानंद ठाकरे रिसोड : वय वर्षे १०१, सीटी स्कोर १२, दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली, अशा विपरित परिस्थितीतही आजीबाईने आत्मविश्वास, ...
विवेकानंद ठाकरे
रिसोड : वय वर्षे १०१, सीटी स्कोर १२, दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली, अशा विपरित परिस्थितीतही आजीबाईने आत्मविश्वास, जिद्दीने कोरोनाविरुद्ध लढा दिला; सोबतीला डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न आणि कुटुंबाचे मानसिक पाठबळ होतेच. या बळावर १०१ वर्षाच्या जयवंताबाई गंगाराम रंजवे (रा. भोकरखेडा ता. रिसोड) या आजीबाईने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातच उपचार घेतले.
एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. ज्येष्ठ नागरीक, सीटी स्कोर अधिक असलेले रुग्णही आत्मविश्वास, जिद्दीच्या बळावर उपचाराला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. त्यामुळेच कोरोनावर मात करून घरी परतत आहेत. रिसोड तालुक्यातील भोकरखेडा येथील जयवंताबाई गंगाराम रंजवे या कोरोनायोद्धा ठरल्या आहेत. आजीबाईंना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही तसेच कानाने ऐकूसुद्धा येत नाही. अशा परिस्थितीमध्ये कोरोनासारख्या महामारीला झुंज देऊन त्या ठणठणीत झाल्या. पंधरा दिवसांपूर्वी सेनगाव तालुक्यातील कवठा येथील आरोग्य उपकेंद्र येथे त्यांना भरती करण्यात आले होते. त्यांचा सीटी स्कोर १२ होता. अशा परिस्थितीत भरती केल्यानंतर त्यांनी औषध उपचाराला चांगला प्रतिसाद दिला. योग्य ती काळजी घेतली. आत्मविश्वास, सकारात्मक विचार, दृढनिश्चय, चिकाटी, जिद्द, कुटुंबाचे मानसिक पाठबळ, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न आदींच्या बळावर त्यांनी हिम्मत न हरता कोरोनावर मात केली. १५ दिवसांनंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. कोरोनावर यशस्वी मात करणाऱ्या या आजीबाईचे स्वागत आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांनी केले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. बेले, डॉ. लादे, डॉ सुभाष कोरडे, डॉ जारे डॉ कोकाटे, डॉ काकडे, डॉ चाटसे, डॉ खांडेकर, मिलिंद पडघान, योगेश राऊत, क्षीरसागर, माळोदे, शेख रफीक यांचे विशेष सहकार्य लाभले.