‘ग्रेड पे’ वाढीसाठी तहसिलदार, नायब तहसिलदारांचे धरणे
By संतोष वानखडे | Published: December 18, 2023 02:42 PM2023-12-18T14:42:09+5:302023-12-18T14:44:09+5:30
दर्जा वर्ग दोनचा; मग वेतनश्रेणी तीनची का? असा सवाल केला जात आहे.
वाशिम : नायब तहसिलदार पदाला वर्ग दोनचा (गट ब) दर्जा असतानाही वेतनश्रेणी वर्ग तीनची (गट क) लागू असल्याने, हा अन्याय दूर करण्यासाठी तहसिलदार, नायब तहसिलदार संघटनेने यापूर्वी विविध टप्प्यात आंदोलन केले. मात्र, शासनाने दखल न घेतल्याने पुन्हा संघटना एकवटली असून, १८ डिसेंबर रोजी वाशिम येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
नायब तहसिलदार पदाच्या वेतनश्रेणीत सुधारणा करून नायब तहसिलदारांना राजपत्रित वर्ग -२ चे ४,८०० रुपयांचे ग्रेड पे लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी तहसिलदार, नायब तहसिलदार संघटनेने सन २००० पासून लढा उभारला. मागील २३ वर्षांच्या दीर्घ कालावधीतदेखील शासनाने या मागणीची दखल घेतली नसल्याने विविध टप्प्यात आंदोलन करून तहसिलदार, नायब तहसिलदार संघटनेने शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मागणी मान्य होत नसल्याचे पाहून पुन्हा एकदा संघटनेचे पदाधिकारी एकवटले असून, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ डिसेंबरला जिल्हास्तरावर सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील ८ तहसिलदार आणि ३० नायब तहसीलदारही सहभागी झाले होते.
इतरांना न्याय; आमच्यावरच का अन्याय?
महसूल विभागाचा अपवाद वगळता अन्य विभागाच्या अराजपत्रित पदांना सहाव्या वेतन आयोगात वरिष्ठ ग्रेड वेतन लागू करून दिलासा दिला, ही बाब स्वागतार्ह आहे. मात्र, महसूल विभागातील नायब तहसिलदारांना राजपत्रित अधिकारी गट ब चा दर्जा असूनही वेतनवाढीचा प्रश्न प्रलंबित ठेवल्याने हा एकप्रकारे अन्याय आहे. या पार्श्वभूमीवर नायब तहसिलदारांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करून न्याय देण्याची एकमुखी मागणी म.रा. तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना जिल्हा शाखा वाशिमच्या पदाधिकाऱ्यांनी केली.