कृषी सहायकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून भरणार!
By admin | Published: March 19, 2017 02:38 AM2017-03-19T02:38:00+5:302017-03-19T02:38:00+5:30
वाशिम जिल्ह्यातील कृषी सहायकांची नऊ रिक्त पदे या पद्धतीने भरली जाणार आहेत.
वाशिम, दि. १८-राज्यातील कृषी सहायकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरण्यात येणार आहेत. याबाबतच्या सूचना शासनाने निर्गमित केल्या असून, वाशिम जिल्ह्यातील कृषी सहायकांची नऊ रिक्त पदे या पद्धतीने भरली जाणार आहेत.
कृषी विभागामध्ये विविध प्रवर्गातील मोठय़ा प्रमाणावर पदे रिक्त असल्याने कर्मचार्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत असून, निर्धारित वेळेत कामे पूर्ण होणे अवघड जात असल्याने ही रिक्त पदे भरण्याची मागणी राज्यातील जिल्हा कार्यालयाकडून सतत करण्यात येत होती. त्या मागणीचा विचार करून शासनाने राज्यात रिक्त असलेली कृषी सहायकांची पदे कृ षी सेवक म्हणून निश्चित वेतन प्रणालीनुसार भारांकन पद्धतीने भरण्याचे निश्चित केले आहे. राज्यात रिक्त असलेली कृषी सहायकांची ७३0 रिक्त पदे याच पद्धतीने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी काही मार्गदर्शक सूचना शासनाने निर्गमित केल्या आहेत. त्यामध्ये उमेदवार हा दहावीची परीक्षा उत्तीर्ण असला तर त्याला शंभर टक्के भारांकन, कृषी पदवी/ पदविका प्राप्त केली असेल, तर शंभर टक्के भारांकन, तसेच ज्या उमेदवारांनी दहावी परीक्षेसह कृषी पदवी/ पदविका प्राप्त केली असेल, त्याला दोन्ही मिळून २00 भारांकन आणि ज्या उमेदवारांनी कृषी पदवी आणि पदविका हे दोन्ही अभ्यासक्रम पूर्ण केले असतील, अशा उमेदवारांनी दोन्हीपैकी ज्या अभ्यासक्रमात जास्त टक्केवारी प्राप्त केली आहे, ती ग्राह्य धरण्यात येईल. याशिवाय शासनाच्या ५ ऑक्टोबर २0१५ च्या निर्णयातील तरतुदी, तसेच २९ डिसेंबर २0१५ च्या जाहिरातीनुसार इतर मार्गदर्शक सूचनांचे पालन करून ही पदे भरण्यात येणार आहेत. या प्रक्रि येंतर्गत उमेदवारांची गुणवत्ता यादी सुधारित करून प्रसिद्ध करण्याची कार्यवाही संबंधित विभागीय कृषी सहसंचालक स्तरावर होणार आहे.
शासनाच्या निर्णयानुसार कृषी सहायकाची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून भरण्यात येत आहेत. ही प्रक्रिया थोडी लवकर पूर्ण झाली, तर आमच्याकडील मनुष्यबळ वाढून कामे लवकर होण्यास आधार होईल. जिल्ह्यात कृषी सहायकांची नऊ पदे रिक्त आहेत.
- दत्तात्रय गावसाने
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम