कृषी केंद्रांमध्ये माहितीदर्शक फलकच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 01:18 AM2017-07-20T01:18:08+5:302017-07-20T01:18:08+5:30

किमतीबाबत शेतकऱ्यांची होतेय फसगत : कृषी विभागाच्या निर्देशाला कोलदांडा

Agricultural centers do not have information boards! | कृषी केंद्रांमध्ये माहितीदर्शक फलकच नाहीत!

कृषी केंद्रांमध्ये माहितीदर्शक फलकच नाहीत!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: रासायनिक खते, कीटकनाशक व बियाण्यांच्या अधिकृत किमतीसंदर्भात शेतकऱ्यांची फसगत होऊ नये तसेच खत, बियाणे, कीटकनाशकांची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, या दृष्टिकोनातून प्रत्येक कृषी सेवा केंद्राच्या दर्शनी भागात उपलब्ध साठा व किमतीची माहिती दर्शविणारा तक्ता लावणे बंधनकारक आहे. या नियमाची वाशिम जिल्ह्यात सर्वत्रच पायमल्ली होत असल्याची बाब ‘लोकमत’ने मंगळवार व बुधवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनने समोर आणली आहे.
आता पेरणीचा हंगाम जवळपास संपल्यात जमा आहे. तथापि, बहुतांश कृषी सेवा केंद्रांनी बियाणे, खते व कीटकनाशकांचा एकूण उपलब्ध साठा, अधिकृत किमती व अन्य माहितीदर्शक फलक दुकानाच्या दर्शनी भागात लावले नाही, अशी माहिती ‘लोकमत’ प्रतिनिधींना मिळाली होती. या माहितीच्या आधारे रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा, वाशिम शहरातील काही कृषी सेवा केंद्रांना मंगळवार व बुधवारी भेट दिली असता, दर्शनी भागात कोणतेही फलक आढळून आले नाही. काही कृषी सेवा केंद्रांत माहितीदर्शक फलक असल्याचे दिसून आले; मात्र त्यावर जुनीच माहिती असल्याचे आढळून आले.
खते व कीटकनाशकांच्या अधिकृत किमती किती आहेत, आवश्यक ते खत व कीटकनाशकाचा साठा किती आहे, याची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, यासाठी दर्शनी भागात दरपत्रक व माहिती फलक लावणे बंधनकारक आहे. मानोरा शहरातील पाच कृषी सेवा केंद्रांत जाऊन पाहणी केली असता, एकाही ठिकाणी अद्ययावत माहितीदर्शक फलक आढळून आला नाही. एका ठिकाणी फलक होता; मात्र त्यावर जुनीच माहिती असल्याचे दिसून आले. रिसोड शहरातील पाच कृषी सेवा केंद्रांना भेटी देण्यात आल्या. यावेळी एका कृषी सेवा केंद्रात माहितीदर्शक फलक आढळले; परंतु तेथे जुनीच माहिती होती, तर उर्वरित चार कृषी सेवा केंद्रात कोणतेही फलक आढळून आले नाही.
कारंजा शहरातील सहा कृषी सेवा केंद्रांना भेटी देण्यात आल्या. यापैकी एकाही कृषी सेवा केंद्रावर दर्शनी भागात किंवा दुकानाच्या आत माहितीदर्शक फलक आढळून आले नाही. वाशिम शहरातील चार कृषी सेवा केंद्रांना भेट दिली असता एका कृषी सेवा केंद्रात फलक आढळून आले तर तीन कृषी सेवा केंद्रात कोणतेही फलक नसल्याचे दिसून आले.
कृषी सेवा केंद्रांमध्ये दर्शनी भागात दरपत्रक व माहितीदर्शक फलक लावण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिलेल्या आहेत. तथापि, या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. दरपत्रक नसल्याने किमतीबाबत शेतकऱ्यांची फसगत होण्याची शक्यता बळावली आहे. खत व कीटकनाशकाच्या किमतीवर काही सूट असल्यास त्याची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. पर्यायाने शेतकऱ्यांची फसगत होते. याकडे कृषी विभागाने लक्ष देणे गरजेचे ठरत आहे.

खताचा काळाबाजार, जादा दराने विक्री, लिंकिंग पद्धत आदी शेतकऱ्यांना भंडावून सोडणाऱ्या गैरप्रकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी विभागाने तालुका स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती केलेली आहे. कृषी सेवा केंद्राला भेट देताना, त्या केंद्राच्या दर्शनी भागात माहितीदर्शक फलक आहे की नाही, याची पाहणी केली जाते की नाही, यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. भरारी पथकाने अशी पाहणी केली तर सर्व केंद्रांमध्ये माहितीदर्शक झळकू शकेल, यात शंका नाही.

कृषी सेवा केंद्रांनी दर्शनी भागात माहितीदर्शक फलक लावावे, अशा सूचना सर्वांनाच दिलेल्या आहेत. याउपरही कुणी या सूचनांची अंमलबजावणी करीत नसेल, तर ही गंभीर बाब आहे. भरारी पथकाच्या माध्यमातून पाहणी केली जाईल. नियमाचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध निश्चितच कारवाई केली जाईल.
- नरेंद्र बारापत्रे
कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम.

Web Title: Agricultural centers do not have information boards!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.