वाशिम जिल्ह्यातील २५ गावांमध्ये राबविले जाणार कृषी यांत्रिकीकरण उपअभियान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 03:37 PM2018-06-27T15:37:22+5:302018-06-27T15:39:13+5:30
वाशिम जिल्ह्यातील निवडक २५ गावांमध्ये कृषी कल्याण अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी २७ जूनला दिली.
वाशिम : सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी केंद्रशासनाने ‘ट्रान्सफॉर्मेशन आॅफ अॅस्पीरेशनल डिस्ट्रिक्टस्’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यात समाविष्ट वाशिम जिल्ह्यातील निवडक २५ गावांमध्ये कृषी कल्याण अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी २७ जूनला दिली.
जिल्ह्यातील निवडक २५ गावांमध्ये प्रत्येकी १० शेतकऱ्यांची निवड करून संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीचे कृषी साहित्य खरेदी करण्यासाठी २ ते २.५ लाखांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी ‘ट्रान्सफॉर्मेशन आॅफ अॅस्पीरेशनल डिस्ट्रिक्टस्’ या कार्यक्रमात समाविष्ट राज्यातील ४ जिल्ह्यांकरिता केंद्रशासनाने ८ कोटी रुपये व त्याप्रमाणात राज्यशसनाने ५.३३ कोटी, अशा एकंदरित १३.३३ कोटी रुपयांचा निधीस प्रशासकीय मान्यता दर्शविण्यात आलेली आहे.
सदर कार्यक्रमाची सन २०१८-१९ या वर्षात सर्वसाधारण प्रवर्गासाठी अंमलबजावणी करण्याकरिता १० कोटी रुपयांचा निधी कृषी आयुक्यांच्या वित्तीय व्यवस्थापन प्रणालीवर वितरित करण्यात आला असून उपअभियानांतर्गत अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गाचा निधी स्वतंत्रपणे वितरित करण्यात येईल, असे कळविण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली.