वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, आठवडी बाजार आजपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 02:55 PM2020-03-20T14:55:53+5:302020-03-20T14:55:58+5:30
२० मार्चपासून सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, उपबाजार आणि आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. या अंतर्गत शाळा, महाविद्यालये, मॉल्स, शिकवणीवर्ग आणि चित्रपटगृहे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केल्यानंतर आता जिल्ह्यातील २० मार्चपासून सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, उपबाजार आणि आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवार १९ मार्च रोजी जारी केले.
वाशिम जिल्ह्यात अद्याप कारोनाची लागण झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही. तथापि, परजिल्ह्यातून एखादा बाधित रुग्ण जिल्ह्यात दाखल झाल्यास आणि गर्दीच्या ठिकाणी अशा व्यक्तीचा वावर झाल्यास इतरांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच गर्दी होणारे सर्व कार्यक्रम, व्यवसाय, बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यात शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणीवर्ग, अभ्यासिका, मॉल्स, चित्रपटगृहे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश यापूर्वी जारी करण्यात आले असून, काही ठिकाणी भरणारे आठवडी बाजारही बंद ठेवण्यात आले आहेत. आठवडी बाजार आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांतही मोठ्या प्रमाणात गर्दी होते जिल्ह्यातीलच नव्हे, तर परजिल्ह्यातील नागरिकही या ठिकाणी खरेदीविक्रीसाठी येतात आणि त्यातून कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार होण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समित्या, उपबाजार आणि पुढे भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. सर्व बाजार समित्याचे सचांलक मंडळ आणि सचिवांना या आदेशाबाबत अवगतही करण्यात येत आहे, तर आठवडी बाजाराची जबाबदारी असलेल्या नगर पालिका, नगर पंचायती आणि ग्रामपंचायतींनाही या आदेशाबाबत अवगत करण्यात आले आहे.
यार्डात आलेल्या कापसाची मोजणी
कापूस पणन महासंघ व सीसीआयकडून सुरू असलेली कापूस खरेदी ४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी १८ मार्च रोजी जारी केले आहेत. तथापि, हे आदेश जारी करण्यापूर्वी सीसीआय आणि पणन महासंघाच्या खरेदी केंद्रावर मोजणीसाठी अनेक शेतकºयांनी कापूस मोजणीसाठी आणला होता. या शेतकºयांची गैरसोय होऊ नये. त्यांना वाहनाचा भुर्दंड सोसावा लागू नये म्हणून टोकण दिलेल्या शेतकºयांचा सर्व कापूस गुरुवारी मोजून घेण्यात आला.
पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्री बंद
वाशिम: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील व ग्रामीण क्षेत्रातील मद्यविक्री १९ मार्चपासून ते पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हृषिकेश मोडक यांनी १९ मार्च रोजी दिले.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील व ग्रामीण क्षेत्रातील सर्व बार व रेस्टॉरंट, सीएल-३ अनुज्ञप्ती (देशी दारू किरकोळ विक्री), एफ.एल. २ अनुज्ञप्ती (विदेशी दारू), एफ.एल.२ (बार), एफ. एल. ४ (क्लब) अनुज्ञप्ती १९ मार्च ते पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी यांनी दिले आहेत. या आदेशाचे पालन न करणाºयाविरूद्ध कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद आहे.