कीटकनाशकांच्या विक्रीवर कृषी विभागाचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 01:57 PM2018-07-07T13:57:46+5:302018-07-07T14:00:15+5:30
कृषी सेवा केंद्रात विकल्या जाणाऱ्या कीटकनाशकांची तपासणी करण्याबरोबरच फवारणी यंत्रांचीही गुण नियंत्रण पथकांमार्फत तपासणी केली जात आहे.
वाशिम: गतवर्षी अमरावती विभागात कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विषबाधा झाल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. नियमबाह्य अणि बोगस कीटकनाशकाच्या वापरामुळे हा प्रकार घडला. यंदा हा प्रकार होऊ नये म्हणून कृषी विभाग कमालीची दक्षता बाळगून आहे. यासाठी कृषी सेवा केंद्रात विकल्या जाणाऱ्या कीटकनाशकांची तपासणी करण्याबरोबरच फवारणी यंत्रांचीही गुण नियंत्रण पथकांमार्फत तपासणी केली जात आहे.
अमरावती विभागात गतवर्षी कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन २०० हून अधिक शेतकºयांचा बळी गेला. प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यात याचे सर्वाधिक प्रमाण होते. या प्रकाराची दखल राज्य शासनाने घेऊन कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले होते. या घटनांनंतर काही कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द करण्यासह काहींवर कायदेशीर कारवाईसुद्धा झाली होती. आता यंदाच्या खरीप हंगामातील पेरणी ७० टक्क्यांहून अधिक आटोपली असून, सुरुवातीच्या पेरणीची पिके चांगली तरारली आहेत. या पिकांवर कुठेकुठे अळ्या, किडींचा प्रादुर्भाव होत असताना शेतकऱ्यांनी फवारणीची लगबग सुरू केली आहे. अशात गतवर्षीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ न निष्पाप बळी जाऊ नयेत म्हणून कृषी विभाग सजग झाला आहे. कृषी सेवा केंद्र प्रमाणित औषधांचीच विक्री करीत आहेत की बनावट आणि जहाल कीटकनाशके विकून शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घालत आहेत, याची पडताळणी करण्यासाठी कृषी विभागाकडून कृषी सेवा केंद्रांची पाहणी करण्यात येत आहे. या दरम्यान, परवाना नसलेल्या काही कीटनाशकांच्या विक्रीवर कृषी विभागाने बंदीही घातली आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, जहाल कीटकनाशकांच्या विक्रीतून शेतकºयांचा जीव धोक्यात येऊ नये, याची दक्षता कृषी विभाग बाळगत असून, यासाठीच कृषी सेवा केंद्रांवरील कीटकनाशकांची गुण नियंत्रण पथकांमार्फत तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीत परवाना नसलेल्या किंवा जहाल कीटकनाशकांची विक्री करण्यात येत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाईसुद्धा करण्यात येत आहे.
-दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम.