घाम गाळून पिकविलेला माल अडकला शेतातच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 02:49 PM2019-11-24T14:49:59+5:302019-11-24T14:50:08+5:30
जिल्ह्यातील बहुतांश पाणंद रस्ते क्षतीग्रस्त होण्यासोबतच या रस्त्यांवर चिखल साचून असल्याने शेतांमध्ये शिल्लक राहिलेला माल घरी आणता येणे अशक्य झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकविलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातून शेतकरी कसेबसे सावरण्याचा प्रयत्न करित आहेत; मात्र जिल्ह्यातील बहुतांश पाणंद रस्ते क्षतीग्रस्त होण्यासोबतच या रस्त्यांवर चिखल साचून असल्याने शेतांमध्ये शिल्लक राहिलेला माल घरी आणता येणे अशक्य झाले आहे.
शेतकरी, शेतमजूरांचा विविध कामांबाबत महसूल विभागाशी दैनंदिन संबंध येतो. त्यांच्या समस्या, प्रश्न निकाली निघावेत, यासाठी तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतीमान व पारदर्शी व्हावे, या उद्देशाने महाराजस्व अभियानाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. असे असले तरी जिल्ह्यात या अभियानास पूर्णत: खीळ बसली असून शासकीय जमिनीवरील अतीक्रमण काढणे व गाव नकाशानुसार शेतशिवारांमधील अतीक्रमीत रस्ते, पाणंद रस्ते, शिवार रस्ते, शेतांवर जाण्याचे पायमार्ग मोकळे करण्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
एकीकडे शेतकऱ्यांचा माल मुंबई, पुणे येथे पाच ते सहा तासात पोहोचविण्यासाठी शासनाकडून रस्त्याचे जाळे निर्माण केले जात असल्याचे भासविण्यात येत आहे; तर दुसरीकडे मात्र शेकडो शेतकºयांच्या शेतांना जोडल्या जाणाºया पाणंद रस्त्यांची पुरती दुरवस्था झाली असून खरीप हंगामात पिकलेला शेतमाल घरी आणता येणे यामुळे अशक्य झाल्याने शेतकरी वैतागले आहेत.
शिरपूर परिसरात सर्वाधिक समस्या; शेतकरी त्रस्त
पाणंद रस्ते नादुरूस्त असण्याची सर्वाधिक समस्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरातील गावांना जाणवत आहे. शिरपूर-केळी-भेरा, शिरपूर-माणका, शिरपूर-वडप हे पाणंद रस्ते प्रचंड खराब झाले असून जिल्ह्यातील इतरही तालुक्यांमधील ग्रामीण भागात पाणंद रस्त्याची अवस्था अत्यंत दयनिय झालेली आहे. याकडे मात्र महसूल विभागाचे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे.
शिरपूर येथून केळी, भेरा शेतशिवाराकडे जाणाºया पाणंद रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चिखलामुळे शेतात ये-जा करणे कठीण झाले असून सोयाबीन अद्यापपर्यंत शेतातच पडून आहे. रब्बी हंगामाची पेरणी देखील यामुळे रखडली आहे. प्रशासनाने रस्त्याची दुरूस्ती करावी.
- संजय गोपाळराव देशमुख
त्रस्त शेतकरी, शिरपूर
जिल्ह्यात महाराजस्व अभियानांतर्गत विविध स्वरूपातील कामे सातत्याने सुरू असतात. त्यातूनच पाणंद रस्त्यांच्या दुरूस्तीचा प्रश्नही मार्गी लावला जाईल. जिथे आवश्यक आहे, तिथे नवीन पाणंद रस्ता देण्याचे प्रयत्न असतील.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम