बसस्थानकातील बेवारस ‘पर्स’ने उडाली पोलिसांची तारांबळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 03:40 PM2019-12-29T15:40:37+5:302019-12-29T15:41:22+5:30
बेवारस पर्समध्ये नेमके काय आहे, याची चाचपणी करण्यापूर्वी बॉम्ब शोधक व नाशक पथकाने बसस्थानकात थांबून असलेल्या सर्व प्रवाशांना तत्काळ बाहेर जाण्याच्या सूचना केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नेहमीप्रमाणे शुक्रवार, २७ डिसेंबरलाही एस.टी.ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीने वाशिमचे बसस्थानक गजबजले होते. अशात फलाटातील आसनावर एकेठिकाणी पांढºया रंगाची पर्स बेवारस आढळली. त्याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर मात्र पर्समध्ये नेमके काय आहे, याचा शोध घेताना सलग २ तास पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
यापूर्वी महाराष्ट्रात विविध ठिकाणी बेवारस साहित्यांव्दारे घातपाताच्या घटना घडलेल्या आहेत. त्या पृष्ठभुमिवर वाशिम पोलिस दलही सक्रीय असून जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथकामार्फत जिल्हाभर तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. यादरम्यान शुक्रवारी सायंकाळी ९ वाजताच्या सुमारास वाशिम बसस्थानकातील फलाटावर एक बेवारस पर्स ठेऊन असल्याचे आढळून आले. त्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राखोंडे यांनी तत्काळ बॉम्ब शोधक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक एकनाथ राठोड यांना दिली. त्यावरून राठोड यांच्या पथकाने सर्व आवश्यक साहित्य घेऊन घटनास्थळी धाव घेतली. यासोबतच कृष्णा आणि प्रिन्स नामक श्वानांचे पथकही दाखल झाले. पर्स बेवारस असल्याने त्यात घातपात घडविण्याचे साहित्य देखील असू शकते, ही बाब लक्षात घेऊन सुरूवातीला संपूर्ण बसस्थानक निर्मनुष्य करण्यात आले. परगावी जाणाºया बसेस जागीच थांबविण्यात येऊन पोलिसांनी ‘स्कॅनिंग, एक्स-रे मशीन’ व श्वान पथकामार्फत कसून तपास केला. दीड तास चाललेल्या या प्रक्रियेनंतर पर्समध्ये घातपाताचे कुठलेही साहित्य नसल्याचे निदर्शनास आले आणि पोलिसांची ओढाताण अखेर संपुष्टात आली. तपासकामी राहुल पाटील, दशरथ ढोके, अजय घाटोळे, सत्यप्रकाश सुपारे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
अन् क्षणात झाले बसस्थानक रिकामे
बेवारस पर्समध्ये नेमके काय आहे, याची चाचपणी करण्यापूर्वी बॉम्ब शोधक व नाशक पथकाने बसस्थानकात थांबून असलेल्या सर्व प्रवाशांना तत्काळ बाहेर जाण्याच्या सूचना केल्या. जीवाच्या भितीने प्रवाशांनीही सूचनेचे पालन केले आणि क्षणात बसस्थानक रिकामे झाले.
जिल्ह्यात घातपाताची कुठलीही घटना घडू नये, या उद्देशाने जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गत काही दिवसांपासून तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी बेवारस पर्सबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याठिकाणी देखील सलग दोन तास तपासकार्य करण्यात आले; मात्र पर्समध्ये २१२० रुपये रोख रक्कम व ‘कॉस्मेटिक’ साहित्याशिवाय काही आढळले नाही.
- एकनाथ राठोड
पोलिस निरीक्षक, बॉम्ब शोधक पथक