आकोडा टाकुन विजचोरी
By Admin | Published: July 13, 2017 07:58 PM2017-07-13T19:58:54+5:302017-07-13T19:58:54+5:30
खैरखेडा परिसरातील चित्र : विद्युत पुरवठा खंडित झाल्यास गावातील युवकच करताहेत सुरु
यशवंत हिवराळे / राजुरा
लोकमत न्यूज नेटवर्क
किन्हीराजा विज वितरण कंपनी कार्यालयांतर्गत येत असलेल्या खैरखेडा परिसरात घरगुती तथा शेती वापरासाठी विज वाहिणीवर खुलेआम आकोडा टाकुन मोठ्या प्रमाणावर विज चोरी सुरु आहे. स्थानिक वायरमन तथा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे कमालीचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
खैरखेडा गावासह सुदी ,अनसिंग परिसरात छोटेमोठे तलाव व नदीनाल्याचे मोठ्या प्रमाणावर जाळे आहे. पेरणीनंतर पावसाने मोठ्या प्रमाणावर दडी मारल्याने पाणी स्त्रोतानजीकचे अनेक जण विज कंपनीच्या स्थानिक कर्मचाऱ्याशी अर्थपूर्ण संबंध प्रस्थापीत करीत खुलेआम विज वाहिणीवरुन शेकडो फुट अंतरावर केबलव्दाा आकोडा टाकुन मोठया प्रमाणात विजचोरी करीत आहेत. हा प्रकार सालाबाद रब्बी तथा खरीपाच्या पिकादरम्यान मोठ्या प्रमाणावर सुरु राहत असतांना विज वितरण कंपनीचे स्थानिक कर्मचारी तथा अधिकारी विज चोरीचा हा गोरखधंदा बंद करण्यात डोळेझाक पणा का करतात, याबाबत तर्कवितर्क लावल्या जात आहेत .शेती वापराच्या विज चोरीसह घरगुती वापराचीही विज चोरी या भागात मोठ्या प्रमाणात दिवस रात्र सुरु आहे. वर्षानुवर्षे अव्वाच्या सव्वा येणाऱ्या विज देयकाची प्रमाणिकपणे नियमित भरणा करणाऱ्या नागरिकांच्या घरगुती वापराचे बिल भरण्यास थोडा जरी विलंब झाला तरी विज पुरवठा खंडीत करणे अथवा विज मिटरच काढुन नेण्याचा धमकीवजा इशारा देणारे स्थानिक विज कर्मचारी लाखो रुपयाची होत असलेल्या विज चोरीला अभय का देतात असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
खैरखेडा परिसराचा बहूतांश भुभाग हा धनदार जंगल व दऱ्याखोऱ्याने व्यापलेला आहे.त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या परिसराकडे दुर्लक्ष असल्याचे बोलले जाते, याचाच फायदा घेत स्थानिक विज कर्मचारी विज चोरांशी अर्थपूर्ण संबंध प्रस्थापीत करुन मोठ्या प्रमाणात माया गोळा करीत असल्याची चर्चा आहे. या भागातील विज पुरवठा वारंवार खंडीत असतो, अनेकदा दोन दोन दिवसही विज पुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे0 येथे नेमणुक असलेले वायरमन मुख्यालयी राहत नसल्याने अनेकदा गावातील अप्रशिक्षीत युवकांनाच आपला जीव धोक्यात घालुन विज पुरवठा सुरु करावा लागत असल्याचे वास्तव आहे. विज चोरी करणारे शेकडो फुट अंतरावर उघड्यावरच केबल, स्टार्टर, टाकुन विज पुरवठा होत असल्याने एखादा जबर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठांनी पाहणी करुन हा विज चोरीचा प्रकार थांबविणे गरजेचे आहे.