अकोला जिल्ह्यात ५९ गावे ‘ब्लिचिंग पावडर’विना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 02:01 PM2018-07-29T14:01:31+5:302018-07-29T14:10:15+5:30
अकोला: जिल्ह्यात सध्या ‘व्हायरल फिव्हर’ने डोके वर काढले असताना, जिल्ह्यातील पाच तालुक्यातल्या ४५ ग्रामपंचायती अंतर्गत ५९ गावांमध्ये पाणी पाणी पुरवठा करताना ‘ब्लिचिंग पावडर’चा वापर होत नसल्याचे वास्तव आरोग्य विभागाच्या अहवालात समोर आले आहे.
- संतोष येलकर
अकोला: जिल्ह्यात सध्या ‘व्हायरल फिव्हर’ने डोके वर काढले असताना, जिल्ह्यातील पाच तालुक्यातल्या ४५ ग्रामपंचायती अंतर्गत ५९ गावांमध्ये पाणी पाणी पुरवठा करताना ‘ब्लिचिंग पावडर’चा वापर होत नसल्याचे वास्तव आरोग्य विभागाच्या अहवालात समोर आले आहे. ब्लिचिंग पावडर उपलब्ध नसल्याने स्वच्छ पाणीपुरवठा करण्याच्या कामात संबंधित ग्रामपंचायतींची उदासीनता समोर येत असून, दूषित पाण्याच्या वापरामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत जलसुरक्षक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून गत जून महिन्यात जिल्ह्यातील गावागावांत सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये पाणी आणि ब्लिचिंग पावडरचे नमुने घेण्यात आले असून, या सर्वेक्षणाचा अहवाल गत १२ जुलै रोजी जिल्हा परिषद आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, अकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या पाच तालुक्यातील ४५ ग्रामपंचायती अंतर्गत ५९ गावांमध्ये पाणीपुरवठा करताना ‘ब्लिचिंग पावडर’चा वापर करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींमध्ये ‘ब्लिचिंग पावडर’ उपलब्ध नसल्याचे वास्तव आढळून आले आहे. पावसाळा सुरू असल्याच्या पृष्ठभूमीवर सध्या जिल्ह्यात ‘व्हायरल फिव्हर’ने डोके वर काढले आहे. त्यामध्ये ताप, खोकला, सर्दी, पोटदुखी, डोकेदुखी व इतर प्रकारच्या आजारांनी नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये ‘ब्लिचिंग पावडर’ उपलब्ध नसल्याने, यासंदर्भात संबंधित ग्रामपंचायतींच्या उदासीन कारभारात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
जिल्ह्यात ५९ गावे ब्लिचिंग पावडरविना
आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात गत जून महिन्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात ९४६ पाणी नमुने घेण्यात आले. नमुने तपासणीच्या प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यांत १४३ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. त्यामध्ये अकोला तालुक्यात ४५, बार्शीटाकळी तालुक्यात १५, अकोट तालुक्यात ७, तेल्हारा तालुक्यात ९, बाळापूर तालुक्यात ४०, पातूर तालुक्यात १३ आणि मूर्तिजापूर तालुक्यात १४ पाणी नमुने दूषित आढळून आले.
ग्रामपंचायतींना निर्देश
स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी ज्या गावांत ब्लिचिंग पावडर उपलब्ध नाही, अशा ग्रामपंचायतींनी पाणी पुरवठा करताना नियमित ब्लिचिंग पावडरचा वापर करून, निर्जंतुकीकरण करण्यात यावे, असे निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकाºयांमार्फत १२ जुलै रोजी संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आले.