अकोला-परळी-अकोला पॅसेंजर पुन्हा अंशत: रद्द
By दिनेश पठाडे | Published: September 16, 2023 04:51 PM2023-09-16T16:51:13+5:302023-09-16T16:51:42+5:30
नांदेड रेल्वे विभागाने ४ ते १० सप्टेंबरपर्यंत काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्या अंशत: रद्द केल्या होत्या.
वाशिम : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड रेल्वे विभागातील रेल्वे रुळाची दुरुस्ती काम करण्याकरिता रोलिंग कॉरिडॉर ब्लॉक घेण्यात आला आहे. यापूर्वी अकोला-पूर्णा मार्गावरुन धावणारी अकोला-परळी पॅसेंजर १० सप्टेंबरपर्यंत अंशत: रद्द करण्यात आली होती. पुन्हा त्याच कारणास्तव अकोला-परळी-अकोला पॅसेंजर २४ सप्टेंबरपर्यंत अंशत: रद्द करण्यात आली असून अकोला-परळी वैजनाथ पूर्णापर्यंत आणि परळी-अकोला परभणी ते अकोलापर्यंत धावणार आहे.
नांदेड रेल्वे विभागाने ४ ते १० सप्टेंबरपर्यंत काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्या अंशत: रद्द केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा १६ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार अकोला-पूर्णा मार्गावरुन धावणारी अकोला-परळी वैजनाथ-अकोला (अप-डाऊन) पॅसेंजर अंशत: रद्द करण्यात आली. गाडी क्रमांक ०७७७४ अकोला-परळी पॅसेंजर पुढील १७ ते २४ सप्टेंबरपर्यंत पूर्णा रेल्वेस्थानकापर्यंतच धावणार आहे. ही गाडी पूर्णा-परळी दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे. तर गाडी क्रमांक ०७६०० परळी -अकोला पॅसेंजर १८ ते २४ सप्टेंबरपर्यंत परळी-परभणी दरम्यान अंशत: रद्द असणार आहे. ही रेल्वे या कालावधीत परभणी ते अकोला दरम्यान धावेल. वाशिमवरुन थेट परळी गाठणारी पॅसेंजर रेल्वेच अंशत: रद्द करण्यात आल्याने भाविकांना काहीसा अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेसच्या मार्गात बदल
बर्नाला-हदियाला दरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्याकरिता लाइल ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे अकोला-पूर्णा मार्गावरुन धावणारी नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेसच्या तात्पुरता बदल करण्यात आला आहे. गाडी क्रमांक १२४३९, १२४८५, १२४८६, १२४४० नांदेड-श्रीगंगानगर-नांदेड एक्स्प्रेस १७ ते २२ सप्टेंबर दरम्यान संगपूर, धुरी, बर्नाला, रामपुरा फुल ही स्थानके वगळण्यात आली असून ही रेल्वे या कालावधीत सोनारपूर मार्गे धावेल.