अकोट न.प.वर रणरागिणी धडकल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:11 AM2017-07-18T01:11:00+5:302017-07-18T01:11:00+5:30
वृक्ष संरक्षणाकरिता महिला एकवटल्याची पहिलीच घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट: अकोट उपविभागीय अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी वृक्षतोड करणाऱ्या समाजकंटकावर वन कायद्यानुसार कारवाई करा, ही प्रमुख मागणी करीत घरातील कामे सोडून येथील रणरागिणी १७ जुलै रोजी स्थानिक नगर परिषद कार्यालयावर धडकल्या. वडाला धागे बांधून वटपौर्णिमेला वडाची पूजा करीत न बसता येथील महिला हिरवेगार वृक्ष वाचविण्याकरिता एकत्र आल्या. दारूबंदीच्या मागणीसाठी लढा उभारण्याकरिता महिला एकवटल्याच्या घटना ठिकठिकाणी घडत आहेत; परंतु वृक्ष वाचविण्याकरिता महिला एकवटल्याची ही घटना बहुधा पहिलीच असावी.
अकोट येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत एसडीओंचे निवासस्थान आहे. या परिसरातील ८ हिरव्यागार वृक्षांची अवैधपणे कटाई करण्यात आली. सार्वजनिक विभागाने तीन वाळलेल्या वृक्षांचा लिलाव केला; परंतु प्रत्यक्षात नगर परिषदेची परवानगी नसलेली मोठमोठी हिरवी झाडे कापण्यात आली आहेत; तसेच नरसिंग रोडवरील नझुलच्या जागेवरील हिरवेगार झाड तोडले असताना आम्ही पोहोचल्याने कटाई करणारा पळून गेला आहे. या अवैधपणे वृक्ष कटाई करण्याच्या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर वन कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी वृक्ष लागवड समितीच्या अध्यक्ष शोभा बोडखे, अर्पणा चिखले,चंचल पितांबरवाले, शोभना भांडे, रूचा ठाकूर, कविता राठोर, दीपाली केवटी, राधिका देशपांडे, मीनाक्षी आडे, मंजूषा बोडखे यांच्यासह अन्य महिलांनी केली. यावेळी मुख्याधिकारी तथा वृक्ष प्राधिकरण समितीच्या सचिव गीता ठाकरे यांनी महिलांचे म्हणणे ऐकून घेत निवेदन स्वीकारले. यावेळी महिलांनी, आम्ही झाडे लावतो, शासनसुद्धा चार कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राबवित आहे; परंतु खुलेआम वृक्ष कटाईमुळे शासनाची बदनामी होत असून, योजनेच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.
‘त्या’ दोघींनी वाचविले झाडाला!
अकोट येथील एसडीओंच्या बंगल्यातील अवैध वृक्ष कटाईचे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर समाजात वृक्ष वाचविण्याकरिता जनजागृती व धडपड सुरू झाली आहे. नरसिंग रोडवर नझुलच्या जागेतील एका हिरव्या झाडाची कटाई सुरू असल्याची माहिती वृक्ष लागवड समितीच्या सरचिटणीस चंचल पितांबरवाले व अर्पणा चिखले यांना मिळताच त्या तेथे धावून गेल्या. झाड तोडणाऱ्यास परवानगीपत्राची मागणी करताच त्याने पोबारा केला. त्यामुळे सदर झाड सध्या तरी वाचले. या दोघी जणी गेल्या नसत्या तर ते झाड कापले गेले असते. त्यांच्या पुढाकारामुळे महिलांनी झाड वाचविल्याचा प्रेरणादायी संदेश समाजात गेला; परंतु सध्या विविध कारणे देत वृक्ष तोडण्याचे प्रकार सुरूच आहेत. संबंधित अधिकारी त्वरित कारवाई करीत नसल्यामुळे वृक्षतोड करणाऱ्यांचे मनोबल वाढत आहे. त्यामुळे फोटो सेशन करीत वृक्षारोपण करायचे तरी कशाकरिता, असा प्रश्न विचारला जात आहे. सध्याच्या स्थितीत सर्व नागरिकांनी वृक्ष लागवडीप्रमाणेच वृक्ष वाचविण्याकरिता सर्वांनी एकजूट होण्याची गरज निर्माण झाली आहे.