‘हर हर महादेव’चा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:54 PM2019-03-04T22:54:30+5:302019-03-04T22:54:50+5:30
महाशिवरात्री निमित्ताने जुगाद येथील प्राचीन शिवमंदिरातील शिवलिंगाचे या पंचक्रोशीतील हजारो शिवभक्तांनी दर्शन घेतले. यावेळी ‘हर हर महादेव’च्या गजराने मंदिर परिसर निनादून गेला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : महाशिवरात्री निमित्ताने जुगाद येथील प्राचीन शिवमंदिरातील शिवलिंगाचे या पंचक्रोशीतील हजारो शिवभक्तांनी दर्शन घेतले. यावेळी ‘हर हर महादेव’च्या गजराने मंदिर परिसर निनादून गेला होता.
वर्धा पैनगंगाचा संगम व उत्तर वाहिनी असलेल्या वढा जुगाद येथील अकराशे वर्ष जुने प्राचीन शिव मंदीर आहे. या मंदिराची दूरवस्था झाली होती. दरम्यान, २००२ मध्ये सर्वधर्मियाच्या मदतीने तत्कालीन ठाणेदार सपकाळे व त्यांच्या पोलीस कर्मचारी वर्गांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. भूगर्भातील भव्य शिवलिंग खोदून काढले. आजू बाजुच्या परिसराची साफसफाई केली. २००३ मध्ये पहिल्यांदा महाशिवरात्री निमित्ताने यात्रेचे आयोजन केले. १५ वर्षांपूर्वी मंदिरात भरदिवसा जाण्याची हिंमत होत नव्हती. तिथे २००२ पासून दररोज गावकरी व नजिकचे भाविक पूजा करू लागले.
महाशिवरात्रीनिमित्त सोमवारी सकाळी शिवलिंगाची महापूजा करण्यात आली. यात्रेनिमित्त ठिकठिकाणावरुन त्रिशूल घेऊन भजन दिंडया परिसरात दाखल झाल्या. ‘हर हर महादेव‘चा गजर सातत्याने सुरू होता. दरवर्षीपेक्षा यावर्षी भाविकांनी मोठ्या संख्येने महाशिवरात्री निमित्याने भरण्यात आलेल्या यात्रेत येऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले. दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मंदिराला भेट देऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी विविध सामाजिक संस्थानी भाविकासाठी पाण्याची, फराळाची व्यवस्था केली. शिरपूर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रेदरम्यान शिवभक्त भजन मंडळ कैलाशनगर, रामनवमी उत्सव मंडळ भजन मंडळ, अशोकसिह ठाकूर, मुंगोलीचे सरपंच रुपेश ठाकरे, माथोलीचे सरपंच प्रविण पिंपळकर, पं.स.सदस्य संजय निखाडे, पोलीस पाटील कवडू मत्ते, आनंद उरकुडे यांचा शिवमंदिर जुगादचे विश्वस्त सुधाकर बोबडे यांनी सत्कार केला. पहाटेपासून तर रात्रीपर्यत भक्तांची ये-जा सुरू होती.