पोहरादेवीत ‘जय सेवालाल’चा गजर
By admin | Published: April 4, 2017 01:05 AM2017-04-04T01:05:40+5:302017-04-04T01:05:40+5:30
यात्रेचा आज मुख्य दिवस : देशभरातून भाविक दाखल; स्वयंसेवकांतर्फे स्वच्छता अभियान
जगदीश राठोड - मानोरा
जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे मागील सप्ताहाभरापासून भाविकांनी गर्दी होत असून भाविक आपल्या परंपरेप्रमाणे उमरी येथील शामकी माता व जेतालाल महाराज यांचा नवस फेडून सोमवारी पोहरादेवीत दाखल झाले. यावेळी भाविकांनी ‘जय सेवालाल’चा एकच गजर केल्याने तीर्थक्षेत्र दुमदुमून गेले.
बंजारा धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांच्या संकल्पनेतून २४ मार्चपासून विश्वशांती लक्ष चंंडी यज्ञाने आयोजन केले होते. या यज्ञाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. पंकजा मुंडे, पालकमंत्री संजय राठोड, ना. डॉ. रणजित पाटील, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार मनोहर नाईक, आमदार हरिभाऊ राठोड, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, आमदार अशोक उइके, आमदार रामलू नायक आदींनी भेटी दिल्या. आठवडाभर चालणाऱ्या यात्रेला लाखो भाविक आपली वाहने घेऊन दाखल झाले. सोमवारी काही भाविकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता ते म्हणाले की आम्ही पाच दिवसांपासून येथे दाखल झालो. माहूर, उमरीगड, रुईगड आणि पोहरादेवी येथे दर्शन घेऊन कबूल केलेला नवस फेडून परत गावी जाऊ, असे या भाविकांनी सांगितले. उमरी येथून लाखो भाविकांचा जथ्था सोमवारी पोहरादेवी येथे दाखल झाला. गावात मिळेल त्या घरी तसेच भक्तिधाम, परिसरातील झाडाचा आश्रय घेत भाविक पोहरादेवी परिसरात ठाण मांडून असल्याचे दिसून आले. मंगळवारी श्रीराम जन्मोत्सव पाळणा झाल्यानंतर महंत रामराव बापूचे दर्शन, संत सेवालाल महाराज मंदिर, जगदंबा माता मंदिर दर्शन झाल्यानंतर नवस फेडून भाविक परतीचा मार्ग धरतील. यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी मागील वर्षापासून पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून स्वच्छ यात्रा, शुद्ध यात्रा, सुंदर यात्रा अभियान विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते, शिवसैनिकांचे हजारो हात या कामी चोख कामगिरी बजावत आहेत. तसेच पाणी, आरोग्य सेवा देण्यात येत आहे. यात्रेत येणाऱ्या महिला भाविकांच्या स्नान, प्रातर्विधीकरिता शेकडो शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. ३० मार्चपासून उमरी खुर्द येथून या अभियानाला सुरुवात झाली. ४ एप्रिल रोजी पोहरादेवी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन आहे. यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी भारतीय क्रांती दलाचे मोरसिंगभाई राठोड यांच्याकडून अन्नदाता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.