सर्व पात्र नागरिकांनी लस टोचून घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:38 AM2021-03-28T04:38:47+5:302021-03-28T04:38:47+5:30
वाशिम : जिल्ह्यात शुक्रवार, २६ मार्चपासून आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली. याबाबत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती ...
वाशिम : जिल्ह्यात शुक्रवार, २६ मार्चपासून आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली. याबाबत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी श्णमुगराजन एस. यांनी स्वतः मंगरूळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रामध्ये जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला.
या वेळी उपविभागीय अधिकारी राम मुळे, गट विकास अधिकारी श्री. परिहार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे, सरपंच सौ. प्रियांका महल्ले, उपसरपंच शीला भगत, वनोजा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी एक महिन्यापूर्वी कोरोना लसीचा पहिला डोस वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घेतला होता. त्यानंतर शुक्रवारी तऱ्हाळा येथील आरोग्य उपकेंद्रातील लसीकरण मोहिमेची पाहणी करण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी लसीचा दुसरा डोस घेतला.
जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी या वेळी लसीकरणाला आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. तसेच कोरोना प्रतिबंधक लस पूर्णतः सुरक्षित असून आपल्या परिसरातील इतर नागरिकांनासुद्धा ही लस घेण्यास सांगावे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. तऱ्हाळा येथील आशा सेविका, आरोग्य कर्मचारी यांनी गावामध्ये जनजागृती केल्यामुळे पहिल्याच दिवशी लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच आगामी १५ दिवसांत उपकेंद्र क्षेत्रातील सर्व पात्र व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे सांगितले.
जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी या वेळी मंगरूळपीर तालुक्यातील लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. तसेच कोरोना संसर्गापासून ६० वर्षांवरील व्यक्तींना अधिक धोका असल्यामुळे या वयोगटातील व्यक्तींचे तसेच ४५ वर्षांवरील दीर्घ आजार असलेल्या व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. याकरिता ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व पदाधिकारी यांची माहिती घेऊन जास्तीतजास्त लोकांपर्यंत लसीकरणाची माहिती पोहोचवावी, असे त्यांनी सांगितले.