अडाण प्रकल्पाचे पाचही दरवाजे उघडले; शंभर टक्के साठा: प्रति सेकंद ३०.४३ घनमिटरचा विसर्ग
By नंदकिशोर नारे | Published: September 26, 2023 03:37 PM2023-09-26T15:37:48+5:302023-09-26T15:38:04+5:30
जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे कारंजा-मानोरा तालुक्यातील अडाण प्रकल्पात शंभर टक्के साठा झाला आहे.
वाशिम: जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे कारंजा-मानोरा तालुक्यातील अडाण प्रकल्पात शंभर टक्के साठा झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे नियंत्रण असलेला यवतमाळ पाटबंधारे विभाग सतर्क झाला असून, मंगळवारी सकाळपासूनच या प्रकल्पाचे पाचही दरवाजे प्रत्येकी ५ सेंटीमिटरने उघडून त्यातून प्रति सेकंद ३०.४३ घनमिटर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
अडाण हा जिल्ह्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे सनियंत्रण यवतमाळ पाटबंधारे विभागांतर्गत येते. मागील तीन दिवसांपासून या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने प्रकल्पाच्या साठ्यात वाढ होत आहे. गत १५ जुलै आणि २२ जुलै रोजीही या प्रकल्पात साठा वाढल्याने या धरणाचे पाचही उघडून २० विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी या प्रकल्पात १०० टक्के साठा झाल्याने पाचही दरवाजे ५ सेंटिमीटरने उघडण्यात आले होते. या पाचही दरवाजातून प्रति सेकंद ३०.४३ घनमिटरचा विसर्ग करण्यात येत होता.
तर विसर्ग आणखी वाढविणार
अडाण प्रकल्पात अचानक साठा वाढल्याने पाटबंधारे विभागाने पातळी नियंत्रणासाठी या प्रकल्पाचे पाचही दरवाजे मंगळवारीरी सकाळीच प्रत्येकी ७० सेंटीमिटरने उघडत त्यातून प्रति सेेकंद ३०.४३ घनमिटर पाण्याचा विसर्ग सुरू केला. तथापि, जिल्ह्यात पावसाचा धडाका सुरूच आहे. यामुळे प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग वाढविला जाण्याची शक्यता आहे.
परिस्थितीवर यवतमाळ पाटबंधारे विभागाचे लक्ष
अडाण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने अडाण नदीला पूर येऊन प्रकल्पातील पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. अशात धोक्याच्या पातळीपर्यंत पाणीसाठा वाढू नये म्हणून यवतमाळ पाटबंधारे विभाग परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. यासाठी पाटबंधारे विभागाचे सहअभियंता प्रकल्पावर तळ ठोकून बसले आहेत.