सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी
By admin | Published: June 12, 2014 09:26 PM2014-06-12T21:26:21+5:302014-06-12T21:36:10+5:30
लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव देशभर दिसून आला असला तरी, कारंजा विधानसभा मतदारसंघ या परिस्थितीला अपवाद होता.
वाशिम: लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव देशभर दिसून आला असला तरी, कारंजा विधानसभा मतदारसंघ या परिस्थितीला अपवाद होता. भाजप-सेना युतीसाठी ही चिंतेची बाब असली तरी, मतदारसंघाचे समीकरण वेगळेच असल्याने विजयाचा मार्ग कुणासाठीही सोपा नाही. परिस्थिती कितीही गोंधळाची असली, तरी प्रत्येक पक्षात इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी दिसून येत आहे.
कारंजा विधानसभा मतदारसंघातून १९८0 पासून वाशिमचे रामकृष्ण राठी, रिसोडचे अनंतराव देशमुख, अकोल्याचे गुलाबराव गावंडे आणि बाबासाहेब धाबेकर , वाशिमचे राजेंद्र पाटणी हे निवडून आले. २00९ च्या निवडणुकीत कारंजा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे प्रकाश डहाके, शिवसेना-भाजप युतीचे राजेंद्र पाटणी, अपक्ष सुभाष ठाकरे आणि भारिप-बमसंचे डॉ.सुभाष राठोड या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत स्थानिक उमेदवाराचा मुद्दा प्रभावी ठरून राकाँचे प्रकाश डहाके ३0,३७५ मताधिक्याने निवडून आले.
एप्रिल २0१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला कारंजा मतदारसंघात ६४,८८९, काँग्रेस-राकाँ आघाडीला ६0,९२७, बहुजन समाज पार्टीला ५,९८९ तर मनसेला २,४९८ मते मिळाली. शिवसेना-भाजप युतीला येथून अवघे ३,९६२ मताधिक्य मिळाला. युतीसाठी हा चिंतेचा विषय आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी राकॉंकडून प्रकाश डहाके, सुभाष ठाकरे आणि जयकिसन राठोड हे इच्छूक आहेत. शिवसेनेतही इच्छकांची रांग मोठी असून, त्यात डॉ.सुभाष राठोड, माजी आमदार गजाधर राठोड यांचे पुत्र अनिल राठोड, जि.प.सदस्य रणजित जाधव, दिनेश राठोड, सूर्यप्रकाश दहात्रे इच्छूक आहेत. हा मतदारसंघ भाजपसाठी सुटल्यास नरेंद्र गोलेच्छा आणि सुरेश लुंगे हे निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसला मतदारसंघ सुटल्यास माजी आमदार अनंतकुमार पाटील, माजी जि.प.अध्यक्ष अरविंद पाटील ,ज्योती गणेशपुरे इच्छूक आहेत. माजी आमदार राजेंद्र पाटणी हे अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. राजेंद्र पाटणी मैदानात उतरले तर निवडणूक चुरशीची ठरणार आहे.