वाशिम नगरपालिकेच्या सर्वच शाळा ‘डिजिटल’
By admin | Published: April 8, 2017 01:55 AM2017-04-08T01:55:56+5:302017-04-08T01:55:56+5:30
जिल्ह्यातील पहिली नगरपालिका : शिक्षण विभागाचे कार्य उल्लेखनीय!
वाशिम : नगर परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही संगणक ज्ञानासोबत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्या, याकरिता वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. सर्वच शाळा डिजिटल करण्यात जिल्ह्यात वाशिम नगर परिषद पहिली ठरली आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गंत महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शाळा डिजिटल करण्याबाबत शासनांचा उपक्रम होता. ३१ मार्च २०१७ पर्यंत शाळा डिजिटल करण्याबाबत शासनाचे उद्दिष्ट होते. त्यानुसार लोकवर्गणी, लोकसहभागातून शाळा डिजिटल करण्याबाबतची मोठी चळवळ सुरु झाली व जिल्ह्यात सर्वप्रथम सर्व शाळा वाशिम नगरपलिकेने डिजिटल केल्यात. डिजिटल शाळांमुळे शिक्षकांना व विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापन सुलभ झाले. विद्यार्थी, पालकांचा कल नगर परिषद शाळांकडे वाढला व स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शिकविल्या जात आहे. शाळेचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. वाशिम नगर परिषदेच्या एकूण १७ शाळा असून, या शाळांमध्ये ३२ इंच अॅड्रॉईड टी.व्ही व त्या अनुषंगाने अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर बसविण्यात आले आहे. यासोबतच काही शाळांमध्ये संगणक संचसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली आहे.
३१ मार्चपर्यंत वाशिम नगर परिषदेच्या सर्वच शाळा डिजिटल झाल्या असून, याबाबतीत वाशिम नगरपालिका जिल्ह्यामध्ये पहिली ठरली आहे. सदर शाळा डिजिटल करण्यासाठी सर्व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी शासनाचे कोणतेही अनुदान नसताना काही अंशी लोकवर्गणी व स्वत:च्या खर्चामुळे डिजिटल केल्याने मुख्याधिकारी गणेश शेटे, प्रशासन अधिकारी आकाश आहाळे यांनी सर्वांचे कौतुक केले.
घाणमोळी येथील शाळा वाखाणण्याजोगी
वाशिम नगरपालिकेची घानमोळी येथील प्राथमिक शाळा परिसर, तेथे असलेल्या सुविधा व सर्वच बाबतीत पुढे असलेले विद्यार्थ्यांंचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. शाळेत कोणी अचानक भेट दिली तरी विद्यार्थ्यांमधील शिस्तबद्धपणा दिसून येतो; तसेच कोणतीही माहिती विचारणा केल्यास प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे हात वर दिसून येतील. शिक्षणासोबतच चालू घडामोडींचाही अभ्यास येथील विद्यार्थ्यांना दिसून येतो, यासाठी वाशिम नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी आकाश अहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक बोरकर मेहनत घेत आहेत.
नगर परिषद वाशिम शाळांच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता व दर्जा वाढविण्यासाठी नगर परिषद प्रशासन नेहमीच पुढाकार घेतेय. शाळा डिजिटल व्हाव्यात, यासाठी नियमित आढावा घेण्यात आला. एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, याची विशेष काळजी घेऊन येत्या सत्रात विकासासाठी अधिक लक्ष दिल्या जाईल. - गणेश शेटे, मुख्याधिकारी, नगर परिषद, वाशिम.
न.प.शाळांमध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, यासाठी सर्व मुख्याध्यापक व शिक्षक पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. डिजिटल शाळा झाल्यामुळे विद्यार्थी उपस्थिती वाढली आहे. न.प. शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे. आता प्रत्येक खोली डिजिटल करण्याचा प्रयत्न चालू आहे.
-आकाश अहाळे, प्रशासन अधिकारी, नगर परिषद, वाशिम.
नगर परिषद वाशिम शाळांच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता व दर्जा वाढविण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. यासाठी शाळांना लागणाऱ्या भौतिक सुविधा नगर परिषदेच्या फंडातून पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. नगर परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी त्या-त्या शाळेतील मुख्याध्यापकांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे.
-अशोक हेडा, नगराध्यक्ष, नगर परिषद, वाशिम.