सहपरिवार आत्महत्या करण्याची परवानगी द्या! - शेतकऱ्याची राज्यपालांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 05:30 PM2019-11-15T17:30:55+5:302019-11-15T17:31:32+5:30
संपूर्ण परिवारास आत्महत्या करण्याची परवानगी तरी द्यावी, अशी मागणी रवि लहाने या शेतकरीपुत्राने राज्यपालांकडे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अवकाळी पावसामुळे सोयाबिन व तूर पिकाचे अतोनात नुकसान झाले. असे असताना कुठलीच शासकीय मदत किंवा विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई अद्यापपर्यंत मिळाली नाही. यामुळे जगणे असह्य झाल्याने सहपरिवार आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी शेतकरीपुत्र रवि वामन लहाने (तिवळी, ता.मालेगाव) याने राज्यपालांकडे १५ नोव्हेंबर रोजी पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
जिल्हाधिकाºयांकडे सादर केलेल्या निवेदनात लहाने याने नमूद केले आहे, की गत काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे वडिलांच्या नावे असलेल्या शेतातील सोयाबिन व तूर पिकाची प्रचंड हानी झाली. महसूल व कृषी विभागाने नुकसानाचे पंचनामेही केले; मात्र अद्यापपर्यंत कुठलीच शासकीय मदत मिळाली नाही. खरीप पिकविमा योजनेत सहभागी होऊन रितसर हप्ता भरला असताना विमा कंपन्यांनीही उदासिन धोरण अवलंबिले आहे. दुसरीकडे अंगाशिरावर वाढत चाललेले कर्ज फेडण्याच्या नोटीस बँकांकडून मिळत आहे. या एकूणच उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे जगणे असह्य झाल्याने तत्काळ शासकीय मदत करण्यात यावी किंवा आमच्या संपूर्ण परिवारास आत्महत्या करण्याची परवानगी तरी द्यावी, अशी मागणी रवि लहाने या शेतकरीपुत्राने राज्यपालांकडे केली.