ग्राम सोनखास ठरतेय प्रती आळंदी!
By admin | Published: August 23, 2016 11:38 PM2016-08-23T23:38:25+5:302016-08-23T23:38:25+5:30
२00 वर्षांंपासून हरिनाम सप्ताहाची परंपरा : वाशिम जिल्हय़ातील ज्ञानेश्वराचे एकमेव मंदिर.
शिखरचंद बागरेचा
वाशिम, दि. २३: गत २00 वर्षांपासून नजिकच्या सोनखास येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्ताहाची परंपरा अविरतपणे सुरू असून आळंदी येथील कार्यक्रम बारमास येथे राबविण्यात येतात. त्यामुळे हे मंदिर प्रति आळंदी म्हणून ओळखले जात आहे, अशी माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष नारायणराव राजाराम गोरे यांनी मंगळवार, २३ ऑगस्ट रोजी दिली.
संत ज्ञानेश्वर माउलीचा पुण्यतिथी सोहळा दरवर्षी उत्साहात आयोजित करण्यात येतो. यावेळी पंचक्रोशितील सुमारे २५ हजार भाविक मंडळी याठिकाणी येवून भक्तिभावाने माउलींच्या चरणी नतमस्तक होतात.
सोनखास या गावातील एका माडीवर सुमारे २00 वर्षांंपूर्वीपासून संत ज्ञानेश्वर माउलीचा सप्ताह साजरा होत असे. सन १७७९ मध्ये नेहमीप्रमाणे सप्ताह सुरु असताना अतवृष्टीमुळे भजन किर्तनात अडथळे निर्माण झाले. परिणामी, संत ज्ञानेश्वर माउलीचे मंदिर स्थापण्याची संकल्पना समोर आली. तत्कालीन विधान परिषद सदस्य व अखिल भारतीय वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष बाळासाहेब भारदे, अकोला येथील तत्कालीन नामांकित डॉक्टर द.रा. भागवत व ह.भ.प. सुखदेव महाराज डिग्रसकर यांच्याहस्ते सन १९८४ मध्ये संत ज्ञानेश्वर माउलींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. आळंदी येथील दैनंदिन कार्यक्रम सोनखास येथे राबविण्याचा पायंडा पडला. सद्या मंदिराची व्यवस्था अध्यक्ष नारायण राजाराम गोरे, उपाध्यक्ष संजय बळीराम गोरे, सचिव विठ्ठल भागवत गोरे, कोषाध्यक्ष प्रकाश देवमन गोरे, मार्गदर्शक बाबजी मारोती गोरे, सदस्य शामसुंदर किसन गोरे, रामेश्वर सोपान गोरे, जिजेबा नवृत्ती गोरे, सुर्यकांत गोविंद गोरे, रामभाउ वामन गोरे, विनय मोतीलाल सोमाणी, कचरुलाल नारायणदास भांगडीया व देवराव नथ्थुजी इढोळे यांच्या खांद्यावर आहे.
बांधकामादरम्यान सापडली मुर्ती
वाशिम येथील शिवचौकातील रहिवाशी दिवंगत डॉ. परशराम दत्तात्रय वानखेडे यांनी त्यांच्या मालकीच्या जागेत घराचे बांधकाम करताना संत ज्ञानेश्वर माउलीची पखानाची मूर्ती सापडल्यामुळे घरातच छोटेसे व सुंदर आकर्षक संत ज्ञानेश्वर माउलीचे मंदिर बांधलेले आहे. सन १९९५ मध्ये या मंदिराची स्थापना डॉ.परशराम वानखेडे यांनी डॉ. यु.म. पठाण यांच्या हस्ते केली, हे विशेष. याशिवाय वाशिम शहरात केकतउमरा मार्गावरील ईदगाह परिसरात सन २0११ मध्ये सहा एकरात भुखंड पाडून त्याला संत ज्ञानेश्वर नगर असे नाव रेणुकादास केशवराव निरखी यांनी दिले होते.