कोरोनाबाधितांच्या संख्येबरोबरच मृत्यूच्या आकड्यातही आली घट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 12:50 PM2020-10-09T12:50:16+5:302020-10-09T12:50:34+5:30
CoronaVirus in Washim दिलासादायक चित्र आॅक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला पाहावयास मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी, आरोग्यासंदर्भात नागरिकांची जागरूकता यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येबरोबरच मृत्यूच्या आकड्यातही घट येत असल्याचे दिलासादायक चित्र आॅक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला पाहावयास मिळत आहे.
जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण हा मेडशी ता. मालेगाव येथे ३ एप्रिल रोजी आढळून आला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यातच कुकसा फाटा ता. मालेगाव येथे दोन आणि मुंबईवरून मालेगावला परत येत असताना सहा जणांना कोरोना संसर्ग झाला. मे व जून महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. जुलै महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली. आॅगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या आकड्याचा स्फोट झाला. सप्टेंबर अखेर जिल्ह्यात ४३८१ अशी कोरोनाबाधितांची एकूण संख्या होती. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली तसेच नागरिकही आरोग्याबाबत सतर्क झाल्याने आॅक्टोबर महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालिची घट येत असल्याचे दिलासादायक चित्र दिसून येत आहे. आॅक्टोबर महिन्याच्या सुरूवातीच्या आठ दिवसात कमी प्रमाणात रुग्ण आढळून आले तसेच मृत्यूच्या संख्येतही घट आली.
सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत आॅक्टोबर महिन्यात रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे तसेच मृतकांच्या संख्येतही घट झाल्याचे दिसून येते. जोखीम गटातील नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
-डॉ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी