निकाल ऐकण्यासाठी अलोट गर्दी, विजेत्यांचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 08:02 PM2017-10-09T20:02:05+5:302017-10-09T20:02:40+5:30
वाशिम: जिल्ह्यातील २६१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार ७ आॅक्टोबर रोजी मतदान झाल्यानंतर ९ आॅक्टोबर रोजी या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या मतमोजणीच्या वेळी निकाल ऐकण्यासाठी मतमोजणील केंद्रांवर ग्रामस्थांची अलोट गर्दी उसळली होती. निकालानंतर संबंधित विजेत्या उमेदवारांसह समर्थकांनी मतमोजणी केंद्रांजवळच जल्लोष केला.
लोकमत न्यूज नेटवर्क

शनिवारी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूक मतदान प्रक्रियेत कारंजा तालुक्यातील ५०, रिसोडमधील ४३, वाशिममधील ४८, मंगरुळपीरमधील ३३, मालेगावातील ४७; तर मानोरा तालुक्यातील ४० अशा एकूण २६१ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. यावेळी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची निवड थेट मतदारांकडून होणार असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. दरम्यान, मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर ८ आॅक्टोबर रोजी मतमोजणी प्रक्रियेपूर्वीच सर्व केंद्रावर सरंपच आणि सदस्य पदांच्या उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी ठिय्या मांडला होता. हजारोच्या संख्येने ग्रामस्थांचीही उपस्थिती होती. वाशिम तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी बसस्थानकाजवळील कोरोनेशन हॉल, रिसोड तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी रिसोडच्या बाबासाहेब धाबेकर विद्यालयातील, इनडोअर स्टेडिअममध्ये मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींची तहसील कार्यालयावर, मंगरुळपीर तालुक्यातील ग्रामपंचायतींची लाल बहादूर शास्त्री भवनात, कारंजा तालुक्यातील ग्रामपंचायतींची मंगरुळपीर रोडवरील शेतकरी निवास सभागृहात, तर मानोरा तालुक्यातील ग्रामपंचायतींची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शांततेत पार पडावी, यासाठी निवडणूक विभाग आणि पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. मतमोजणीचे निकाल लागल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरंपंच, सदस्यांसह ग्रामस्थांनी मतमोजणी केंद्रांवर जल्लोष केला.