पर्यावरण संवर्धनाचे असेही ‘वेड’; एक लाख बियांचे संकलन! निसर्गप्रेमी युवकाचा प्रवास
By नंदकिशोर नारे | Published: January 29, 2023 10:50 AM2023-01-29T10:50:45+5:302023-01-29T10:51:44+5:30
डाेक्यात पर्यावरण संवर्धनाचा विचार... मनात वृक्ष संवर्धनाची तळमळ... अशा निसर्गप्रेमी युवकाने चक्क जंगलात वेळ, काळ न पाहता भटकंती करत चक्क ७४ प्रकारच्या १ लाख बिया गाेळा केल्या.
- नंदकिशाेर नारे
वाशिम : डाेक्यात पर्यावरण संवर्धनाचा विचार... मनात वृक्ष संवर्धनाची तळमळ... अशा निसर्गप्रेमी युवकाने चक्क जंगलात वेळ, काळ न पाहता भटकंती करत चक्क ७४ प्रकारच्या १ लाख बिया गाेळा केल्या.
संकलित बियांचे मागेल त्याला माेफत वितरण सुरू केले. सीड्स बाॅलची निर्मिती, राेपे तयार करण्याचे प्रशिक्षणही देत लाेकजागराचे व्रत त्याने हाती घेतले आहे. पर्यावरण संवर्धनाचे ‘वेड’ असणाऱ्या या युवकाचे नाव आहे निखिल चव्हाण.
स्पर्धा परीक्षेची करतोय तयारी
n मानाेरा तालुक्यातील माहुली येथील रहिवासी निसर्गप्रेमी निखिल चव्हाण हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. फावल्या वेळात ताे जंगलात रात्री-बेरात्री, पहाटे उठून जाऊन विविध प्रकारच्या बियांचे संकलन करून पावसाळ्यात या बिया वन, जंगल परिसरात फेकून वृक्षाराेपण करत आहे.
n तसेच सीड्स बॉल, बीज संकलन, रोपे तयार करणे या विषयावर मोफत कार्यशाळा आयोजित करून जनजागृती करण्याचे कार्यही त्याच्या हातून घडत आहे. आपल्याकडे विदेशी झाडांची संख्या जास्त आहे.
n यामध्ये गुलमोहर, सप्तपर्णी, रेन ट्री यासारखी झाडे लावली जात आहेत. या झाडांचा पर्यावरणाला कसल्याही प्रकारचा फायदा नसल्याने याऐवजी देशी झाडे लावली जावीत व त्याचा फायदा जैवविविधतेला व्हावा, हाच उद्देश समाेर ठेवून कार्य हाती घेतल्याचे निखिल सांगतो.
मागेल त्याला बीज देताे माेफत
निसर्गमित्र निखिल चव्हाण याने वाशिम जिल्ह्यात, परिसरात जंगल, डोंगर फिरून आंबा, फणस, चिंच, पळस, आपटा, बाबूळ, काटेसावर, सागवान, अर्जुन कडुनिंब, हिवर, बेहडा, सीताफळ, रामफळ, बेलपत्री, करंजी, चारोळू, बहावा, रिठा, पांगारा, कठव, जांब, जाभूळ, आवळा, मोह, शेवगा, बकुळ, भोकर आदी प्रकारच्या बिया जमा केल्या. मागेल त्याला मोफत दिल्या व काहींची रोपे तयार करून मोफत देत आहे.