पाेलीस मित्रांची रुग्णवाहिका ठरतेय अपघातग्रस्तांसाठी वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:28 AM2021-06-11T04:28:00+5:302021-06-11T04:28:00+5:30
धनज बु.: आपत्कालीन स्थितीत रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत या सामाजिक दायित्वातून धनज बु. येथील पोलीस मित्रांनी सुरू ...
धनज बु.: आपत्कालीन स्थितीत रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत या सामाजिक दायित्वातून धनज बु. येथील पोलीस मित्रांनी सुरू केलेली रुग्णवाहिका गंभीर जखमी रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.
धनज बु. येथील माजी पंं.स. सदस्य व पोलीस मित्र विजय हिवाळे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वतःच्या मालकीची असलेली चारचाकी वाहन गावातील गरजू रुग्णांच्या सेवेसाठी सुरू केली आहे.
धनज प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अपघातग्रस्त रुग्णांसाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने अनेक वेळा रुग्णांना अमरावती किंवा अन्य ठिकाणी उपचाराकरिता घेऊन जाण्यासाठी कुठली सुविधा नव्हती. त्यामुळे वेळेवर रुग्णांच्या नातेवाइकांची मोठी तारांबळ उडायाची. त्यामुळे गावात अपघातग्रस्तांसाठी रुग्णवाहिका असावी या उद्देशाने धनज येथील पोलीस मित्रांनी एकत्र येऊन माजी पं.स. सदस्य विजय हिवाळे यांच्या पुढाकारातून रुग्णवाहिका तयार केली. आतापर्यंत या रुग्णवाहिकेने पाच गंभीर जखमी असलेल्या रुग्णांचे प्राण वाचविले आहे.
तसेच ८ जूनला रात्री धनज बु।। येथील प्रा. आरोग्य केंद्रासमोर गवंडी काम करून घरी परत असताना दोन दुचाकीस्वारांचा अपघात होऊन गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती धनज पोलिसांना मिळाली असता ठाणेदार अनिल ठाकरे व कर्मचाऱ्यांनी सदर रुग्णांना प्रथमोचार करून या रुग्णवाहिकेने पुढील उपचाराकरिता अमरावती येथे पाठविले.