पासिंगसाठी ‘आरटीओ’कडे पाठविलेली रुग्णवाहिका परत मिळालीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:28 AM2021-06-17T04:28:14+5:302021-06-17T04:28:14+5:30
मोप प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सुमारे २७ गावांचा समावेश आहे. गरोदर मातांचे बाळंतपण हे नियमानुसार शासकीय रुग्णालयांमध्ये होणे गरजेचे असल्याने ...
मोप प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सुमारे २७ गावांचा समावेश आहे. गरोदर मातांचे बाळंतपण हे नियमानुसार शासकीय रुग्णालयांमध्ये होणे गरजेचे असल्याने रुग्णवाहिकेची नितांत आवश्यक भासत होती. त्यानुसार, मोप प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळालीदेखील; परंतु अवघ्या काहीच दिवसांत वाशिम येथील आरटीओ कार्यालयाकडे सदर रुग्णवाहिका पासिंगच्या नावाखाली बोलावून परत पाठविलीच नाही. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. या संदर्भात रुग्णवाहिका समन्वयक मारोती गव्हाणे यांच्याशी संपर्क साधला असता, मोप प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नावाने रुग्णवाहिका दिलीच नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र नवी रुग्णवाहिका मिळाल्याचे कागदपत्रांवरून निष्पन्न होत आहे. हा संभ्रम यंत्रणेतील वरिष्ठांनी दूर करून मोपला रुग्णवाहिका मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.
................
कोट :
मोप प्राथमिक आरोग्य केंद्राला नव्याने रुग्णवाहिका प्राप्त झाली होती. काही दिवसांपूर्वी ती वाशिम येथील आरटीओ कार्यालयाकडे पासिंगसाठी पाठविण्यात आली. तेव्हापासून रुग्णवाहिका परत मिळालेली नाही.
- डाॅ. आशिष सिंह
वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, मोप