दुर्गम भागातील ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी रुग्णवाहिकेचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:41 AM2021-03-26T04:41:58+5:302021-03-26T04:41:58+5:30
शेलूबाजार : परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तिंचे लसीकरण वाढविण्यासाठी आरोग्य विभागाची धडपड सुरू आहे. ...
शेलूबाजार : परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तिंचे लसीकरण वाढविण्यासाठी आरोग्य विभागाची धडपड सुरू आहे. त्यात दुर्गम भागांमध्ये वाहतूक व्यवस्था नसल्याने लसीकरणात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत येत असलेल्या हिरंगी उपकेंद्रामधील ज्या गावातून वृद्धांना ये-जा करण्याची तत्काळ व्यवस्था नाही, अशा गोग्री, खेर्डा बु., खेर्डा खुर्द येथील सर्व ज्येष्ठ नागरिकांना १०२ रुग्णवाहिकेद्वारे आरोग्यवर्धिनी केंद्रात आणून लसीकरण करण्यात येत आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तिंचे लसीकरण वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यात मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार आणि वनोजा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या दुर्गम भागात वाहतुकीची व्यवस्था नसल्याने ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करणे कठीण होत आहे. या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बोराडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद भगत, डॉ. प्रशांत महाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हिरंगी उपकेंद्रातील ज्या गावांमध्ये प्रवासी वाहने जात नाहीत, अशा गावांमध्ये १०२ रुग्णवाहिकेद्वारे कोरोना लसीकरणविषयी जनजागृती करण्यात येत आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी आरोग्यवर्धिनी केंद्रात आणून लस दिल्यानंतर पुन्हा गावात घरपोच सोडण्यात येत असल्याची माहिती आरोग्यसेवक संदीप नप्ते यांनी दिली. या मोहिमेला वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद भगत, डॉ. प्रशांत महाकाळ यांच्यासह आरोग्यसेवक गजानन पवार, आरोग्यसेविका आश्विनी दारव्हेकर यांचे सहकार्य मिळत आहे.