कारंजा, मानोरा येथील पाणीपुरवठा योजनांची १२.७६ कोटींची थकबाकी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 03:43 PM2018-03-13T15:43:00+5:302018-03-13T15:43:00+5:30
वाशिम : कारंजा आणि मानोरा येथील पाणीपुरवठा योजनांकडे १२.७६ कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असून चालू थकबाकीही १.६९ कोटी रुपयांच्या घरात पोहचली आहे
वाशिम : कारंजा आणि मानोरा येथील पाणीपुरवठा योजनांकडे १२.७६ कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असून चालू थकबाकीही १.६९ कोटी रुपयांच्या घरात पोहचली आहे. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची डोकेदुखी वाढली असून थकबाकी वसूलीसाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू असल्याची माहिती ‘मजिप्रा’चे कार्यकारी अभियंता के.के.जीवने यांनी मंगळवारी दिली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून संपूर्ण कारंजा शहरात पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय मानोरा २८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनाही हाताळली जाते. दरम्यान, या दोन्ही मोठ्या पाणीपुरवठा योजनांतर्गत नागरिकांकडे १२.७६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात कारंजाची ११ कोटी ७५ लाख ८ हजार; तर मानोरा २९ गावे पाणीपुरवठा योजनेची थकबाकी १ कोटी ८१ हजार आहे. याशिवाय चालू थकबाकीही १.६९ कोटी रुपये असून त्यातील ५५ टक्के वसूली पूर्ण झाल्याची माहिती जीवने यांनी दिली. तथापि, मागील थकबाकीसह चालू थकबाकी विनाविलंब वसूल करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून सतत पाठपुरावा सुरू असल्याने स्थानिक पातळीवरून वसूलीच्या मोहिमेस गती देण्यात आल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत चालविल्या जाणाºया पाणीपुरवठा योजनांची नियमित वसूली होणे आवश्यक आहे. त्यातूनच पाणी शुद्धीकरणासाठी अॅलम, ब्लिचिंग खरेदी करणे, विद्यूत देयक अदा करणे याशिवाय देखभाल-दुरूस्तीवरील खर्च भागविला जातो. ही बाब लक्षात घेवून नागरिकांनी त्यांच्याकडील थकबाकी विनाविलंब अदा करून ‘मजिप्रा’ला सहकार्य करणे अपेक्षित आहे.
- के.के.जीवने, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वाशिम