ग्रामपंचायत बांधणी योजनेत अमरावती विभाग उपेक्षीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 04:07 PM2018-08-05T16:07:31+5:302018-08-05T16:10:09+5:30
अमरावती विभागातील केवळ ३ ग्रामपंचायतीचा समावेश आहे, तर वाशिम, यवतमाळ आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यातील एकही ग्रामपंचायत यात समाविष्ट नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने ‘बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरू केली आहे. या योजनेत एक हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या आणि स्वत:ची इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी दुसऱ्या टप्यात ५४ ग्रामपंचायतीची व निवड झाली आहे. यात अमरावती विभागातील केवळ ३ ग्रामपंचायतीचा समावेश आहे, तर वाशिम, यवतमाळ आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यातील एकही ग्रामपंचायत यात समाविष्ट नाही.
राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कायालयाची इमारत बांधण्यासाठी ‘बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना’ २३ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयाद्वारे मंजूर करण्यात आली अहे. ग्रामीण भागासाठी पायाभूत सुविधांची असणारी आवश्यकता, त्यासाठी ऊपलब्ध असणाºया स्तोत्रांची मर्यादा विचारात घेऊन बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात १००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या आणि स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नसलेल्या ३०२ ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यास शासनाने मान्यता दिली होती. त्यामध्ये अमरावती विभागातील एक हजार लोकसंख्या असलेल्या आणि स्वत:ची स्वतंत्र इमारत नसलेल्या ४० ग्रामपंचायती समाविष्ट करण्यात आल्या होत्या. यात बुलडाणा जिल्ह्यातील १६, यवतमाळ जिल्ह्यातील १२, अकोला जिल्ह्यातील ७, वाशिम जिल्ह्यातील ३ आणि अमरावती जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला होता. आता दुसºया टप्प्यात ३ आॅगस्ट २०१८ च्या निर्णयाद्वारे ५४ ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये अमरावती विभागाच्या ५ जिल्ह्यातून केवळ तीन ग्रामपंचायतींचा समावेश असून, त्यात अमरावती जिल्ह्यातील २ आणि अकोला जिल्ह्यातील केवळ एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. विभागातील यवतमाळ, अमरावती आणि वाशिम या तीन जिल्ह्यातही स्वत:ची स्वतंत्र इमारत नसलेल्या हजारो ग्रामपंचायती अस्तिवात असून, या ग्रामपंचायतींचा कारभार हा जिल्हा परिषद शाळा, सामाजिक सभागृहे किंवा भाड्याच्या जागेतून चालविण्यात येतो; परंतु या तिन्ही जिल्ह्यातील स्वत: इमारत नसलेल्या एकाही ग्रामपंचायतीचा समावेश बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत करण्यात आलेला नाही.