अमरावती विभागातील ७२३९ गावांतील खरिपाचा नजरअंदाज जाहीर
By दिनेश पठाडे | Published: September 30, 2023 12:58 PM2023-09-30T12:58:39+5:302023-09-30T12:58:50+5:30
विभागाची हंगामी ६० पैसेवारी, पैसेवारीत पीक स्थिती उत्तम दाखविल्याने नाराजी
वाशिम : अमरावती महसूल विभागात समाविष्ट असलेल्या त्या-त्या जिल्ह्याने खरीप हंगाम २०२३-२४ ची हंगामी नजरअंदाज पैसेवारी काढली आहे. त्यानुसार विभागातील ७ हजार २३९ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली असून सर्व गावांची पैसेवारी ५० पैक्षा अधिक आहे. तर विभागाची एकूण पैसेवारी ६० आहे.
अमरावतील विभागात अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या पाच जिल्ह्यातील एकूण गावांची संख्या ७ हजार ४०० एवढी आहे. त्यापैकी लागवडी योग्य असलेल्या गावांची संख्या ७ हजार २३९ आहे. लागवडी योग्य असलेल्या गावांतील खरीप हंगामातील प्रमुख पिकांची पैसेवारी जिल्हास्तरावर काढण्यात आली. विभागात अकोला जिल्ह्याची सर्वात कमी ५७ पैसेवारी तर सर्वाधिक ६२ पैसेवारी ही वाशिम जिल्ह्याची निघाली आहे. विभागात ऑगस्टमध्ये पावसाने मोठा खंड दिला, जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. यामुळे काही जिल्ह्यातील पीक परिस्थिती नाजूक झाली होती. नजरअंदाज हंगामी पैसेवारी ५० पेक्षा कमी निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाल्याचे गृहित धरून पैसेवारी अधिक निघाल्याचे चित्र आहे.
पावसाच्या दीर्घ खंडामुळे पीक उत्पादनात घट होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोंबरमध्ये सुधारित आणि डिसेंबर महिन्यात काढण्यात येणाऱ्या अंतिम पैसेवारीत बदल करण्याचा वाव असल्याने पैसेवारी कमी निघेल अशी शक्यता आहे. शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी कोणतेही अनुदान, आर्थिक मदत, पिकविमा मिळण्यासाठी अनेक घटकांचा विचार केला जातो. यामध्ये पैसेवारीही खूप महत्त्वाची मानली जाते. ५० टक्क्यांच्या आत पैसेवारी आली तर या सर्व बाबींसाठी अनुकूल वातावरण असल्याचे मानले जाते. विभागात प्रमुख पिकांची स्थिती पैसेवारीत उत्तम स्थिती दाखविण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे विभागातील प्रत्येक जिल्ह्याची पैसेवारी ५० पेक्षा कमी काढावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
सर्वात कमी पैसेवारी अकोला जिल्ह्याची
अमरावती विभागातील त्या-त्या जिल्ह्याने जाहीर केलेल्या पैसेवारीमध्ये सर्वात कमी पैसेवारी ही अकोला जिल्ह्याची निघाली असल्याचे दिसून येते. या जिल्ह्यातील १०१२ गावांपैकी लागवडी योग्य असलेल्या ९९० गावांची पैसेवारी ५७ एवढी काढण्यात आली आहे. तर सर्वाधिक पैसेवारी वाशिम जिल्ह्याची ६४ पैसेवारी निघाली आहे. अमरावती, यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्याची पैसेवारी अनुक्रमे ६०, ६१ व ६० एवढी आहे. आगामी सुधारित आणि अंतिम पैसेवारीत बदल होण्याची शक्यता अधिक आहे.