जिल्ह्यात २.१६ लाख कुटुंबांना आनंदाचा शिधा, किटचे वाटप अंतिम टप्प्यात
By दिनेश पाठक | Published: February 25, 2024 07:49 PM2024-02-25T19:49:49+5:302024-02-25T19:50:34+5:30
जिल्ह्यात २५ फेब्रुवारीपर्यंत २ लाख १६ हजार ३९१ कुटुंबांपर्यंत आनंदाचा शिधा पोहचला आहे.
वाशिम : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात पार पडलेला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती या उत्सवांच्या निमित्ताने जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ दिला जात आहे. जिल्ह्यात २५ फेब्रुवारीपर्यंत २ लाख १६ हजार ३९१ कुटुंबांपर्यंत आनंदाचा शिधा पोहचला आहे.
यापूर्वी राज्य सरकारच्या वतीने गुढीपाडवा, गणेशोत्सव व दिवाळी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, अशा सण-उत्सवांनिमित्त पात्र रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा देण्यात आला. गोरगरिबांना सण-उत्सव साजरा करता यावा, यासाठी अवघ्या शंभर रुपयात वेगवेगळे जिन्नस समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा प्रति शिधापत्रिका १ शिधा जिन्नस संच गरजूंना देण्यात आला. जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ३५५ रेशनकार्डधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी शिधा किट नियतन मंजूर झाले होते. त्यानुसार तालुकानिहाय पात्र रेशनकार्डधारकांना किट वितरित करण्याची प्रक्रिया रेशन दुकानदार यांच्याकडून सुरू आहे.
१ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल, तसेच प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात चणाडाळ, रवा, मैदा आणि पोहा, अशा शिधा जिन्नस समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा प्रति शिधापत्रिका १ शिधा जिन्नस संच प्रमाणे ई-पॉस प्रणालीद्वारे १०० रुपयात वितरित केला जात आहे. उर्वरित ३४ हजार लाभार्थी रेशनकार्डधारकांना येत्या दोन ते तीन दिवसांत शिधा किट वितरीत केली जाणार आहे.