मालेगावातील दुग्धजन्य पदार्थांना आंध्र प्रदेशात मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:49 AM2018-01-20T01:49:32+5:302018-01-20T01:50:46+5:30
शिरपूर : मनुष्याच्या अंगी जिद्द व चिकाटी असल्यास तो कोणतेही असंभव कामाला स्वरूप देऊन ते संभव करू शकतो. असाच काहीसा प्रकार मालेगावातील योगेशने करून दाखविला. आजच्या घडीला तो दुधापासून बनवित असलेल्या पदार्थांना आंध्र प्रदेशातून चांगलीच मागणी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : मनुष्याच्या अंगी जिद्द व चिकाटी असल्यास तो कोणतेही असंभव कामाला स्वरूप देऊन ते संभव करू शकतो. असाच काहीसा प्रकार मालेगावातील योगेशने करून दाखविला. आजच्या घडीला तो दुधापासून बनवित असलेल्या पदार्थांना आंध्र प्रदेशातून चांगलीच मागणी आहे. दिवसाकाठी मालेगाव या छोट्याशा गावात ७0 ते ७५ हजार रुपये प्रतिदिन दुग्धजन्य पदार्थाची विक्री करण्याची किमया योगेश रामचंद्र बळी यांनी करून दाखविली आहे. विशेष म्हणजे, या पारंपरिक व्यवसायाला चालविण्यासाठी त्यांनी शिक्षकाची नोकरीसुद्धा सोडून दिली, हे विशेष!
वाशिम जिल्हय़ातील सर्वात छोटा तालुका म्हणून मालेगाव तालुक्याची ओळख आहे. या छोट्याशा गावात योगेशने केलेल्या या किमयेचे सर्वत्र कौतुक होत आहे. योगेशचे वडिलांची दूध डेअरी होती. कोणतीही मिलावट न करता दुधाची विक्री करणारे म्हणून ते शहरात प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांच्या डेअरीचे नावसुद्धा संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध होते. खेड्यापाड्यातील नागरिकसुद्धा दूध, तुपाची चणचण भासली, की बळींच्या डेअरीवरून घेऊन या, असे म्हणायचे. त्यांचा मुलगा शिकून मेहकर येथे शिक्षक म्हणून कार्य करू लागला. सात वर्षांपर्यंत शिक्षक म्हणून कर्तव्य पार पाडत असताना आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या व्यवसायाला पुढे नेण्याच्या दुष्टीने त्याने विचार केला. त्याने दुधासोबत आधी थोड्या प्रमाणात दुग्धजन्य पदार्थ बनवून ते गावातच विकणे सुरू केले. दिवसेंदिवस मागणीत वाढ झाली. यांनी तयार केलेला माल नागपूर येथील एका व्यावसायिकाने नेला व तेव्हापासून नागपूरलासुद्धा यांचा माल जायला लागला.
आजच्या घडीला दिवसेंदिवस प्रसिद्धी मिळत आंध्र प्रदेशातील हैदराबादसह इतर गावात यांच्या दुग्धजन्य पदार्थ्यांच्या मागणीत चांगलीच वाढ झाली आहे. दिवसभर कढईमध्ये दूध घोटण्यासहच विविध दुग्धजन्य पदार्थांचे काम येथे अविरत सुरू राहते. विशेष म्हणजे, आधी छोट्याशा असलेल्या येथील बळी यांच्या डेअरीमध्ये जवळपास १५ मनुष्य काम करतात. येथे तयार करण्यात येत असलेला पेढा सर्वदूर परिचित आहे.
मालेगाव येथे १९८६ पासून रामचंद्र बळी दुधाचा व्यवसाय करायचे. २000 पर्यंत त्यांनी व्यवसाय चालविला. परंतु मेहकर येथे शिक्षक असलेल्या योगेश नामक मुलाने या व्यवसायाला आधुनिकतेचे स्वरुप देत दुग्धजन्य पदार्थ बनविणे सुरु केले. ज्याप्रमाणे वडिलांचे नाव दुधडेअरी व्यवसायात होते तोच विश्वास त्याने दुग्धजन्य पदार्थ विक्रीतही मिळविल्याने आजच्या घडीला त्यांच्या व्यवसायास भरभराटी आली आहे.
वडिलांनी सुरू केलेली दूध डेअरी व तेथे असलेली गर्दी पाहता मी त्यांना मदत करायचो; परंतु नोकरी लागल्याने माझे याकडे दुर्लक्ष झाले. काही वर्षे नोकरी केल्यानंतर विचार आला, की वडिलांच्या व्यवसायाला आधुनिकतेची जोड द्यावी म्हणून मी दुधापासूनच विविध पदार्थ बनविणे सुरू केले. आधी पारंपरिक पद्धतीने बनवित असलेले दुग्धजन्य पदार्थ गुगलवर सर्च करून आधुनिक मशिनरीजची माहिती जाणून घेतली. आज एक एक करता कामापुरत्या मशीन उपलब्ध करणे सुरू आहे. २000 सालापासून मी हातात घेतलेल्या व्यवसायाने आज प्रसिद्धीसह चांगल्या उत्पादनाचा शिक्कामोर्तब झाला आहे. माझ्याकडील पेढा संपूर्ण विदर्भासह आंध्र प्रदेशमध्ये प्रसिद्ध आहे.
-योगेश रामचंद्र बळी, मालेगाव.