अंगणवाडीतील पोषण आहार वाटप प्रकरण : पर्यवेक्षिका, सीडीपीओंना ‘कारणे दाखवा’ नोटीस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 01:02 PM2018-09-26T13:02:46+5:302018-09-26T13:03:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पोषण आहारासंदर्भात जिल्ह्यातील काही अंगणवाडी केंद्रांमध्ये नियोजित वेळापत्रक व नियम पाळले जात नसल्याचा प्रकार ‘लोकमत’ने २६ सप्टेंबर रोजी स्टिंग आॅपरेशनने उजागर करताच, मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी या वृत्ताची दखल घेत अंगणवाडी पर्यवेक्षिका, बालविकास प्रकल्प अधिकाºयांना (सीडीपीओ) बुधवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
अंगणवाडी केंद्रातून बालकांना दोन वेळेला ताजा पोषण आहार पुरविला जावा, कोणत्या दिवशी कोणता ‘मेन्यू’ द्यावा याचे आठवडी नियोजन ठरवून देण्यात आलेले आहे. या विषयाच्या अनुषंगाने २४ व २५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील काही अंगणवाडी केंद्रांत प्रातिनिधिक स्वरुपात स्टिंग आॅपरेशन केले असता, काही केंद्रात ‘आठवडी मेन्यु’नुसार पोषण आहार दिला जात नाही तसेच काही केंद्रात सकाळी शिजविलेलाच आहार दुपारी दिला जातो तर काही केंद्राच्या दर्शनी भागात माहिती फलक लावली नसल्याचे आढळून आले होते. या ‘स्टिंग’ची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी बुधवारी अंगणवाडी पर्यवेक्षिका, बालविकास प्रकल्प अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अंगणवाडी केंद्रात आठवडी नियोजनानुसारच पोषण आहार दिला जावा, प्रत्येक अंगणवाडी केंद्रात पोषण आहारासंदर्भात माहितीदर्शक फलक लावण्यात यावे, सकाळ व दुपारी शिजविलेला ताजा आहारच बालकांना देण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना देतानाच यामध्ये कुणी दिरंगाई केली तर शासन नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा मीना यांनी दिला.