वैशाख पोर्णिमेला चंद्राच्या शीतल प्रकाशात झाली प्राणी गणना
By सुनील काकडे | Published: May 6, 2023 06:23 PM2023-05-06T18:23:37+5:302023-05-06T18:23:57+5:30
काटेपूर्णा अभयारण्यात पार पडली मोहीम
सुनील काकडे, वाशिम: वाशिम आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवर सुमारे ६५०० हेक्टर परिसरात वसलेल्या विस्तीर्ण काटेपूर्णा अभयारण्यात वैशाख पोर्णिमेला, ५ मेच्या रात्री चंद्राच्या शितल प्रकाशात प्राणी प्रगणना करण्यात आली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून यासाठी आलेले वन्यप्रेमी व वनपर्यटकांनी ५ मे रोजी दुपारी २ वाजेपासून अभयारण्यातील पानवठ्यालगत उभारलेल्या मचानावर रात्रभर जागे राहून वन्यप्राण्यांच्या हालचालीची बारकाईने नोंद घेतली.
हौशी पर्यटक आणि वन्यजीव प्रेमी दरवर्षी वैशाख पोर्णिमेच्या रात्रीची आतुरतेने वाट पाहत असतात. या रात्रीला चंद्र तुलनेने अधिक प्रकाशमान राहत असल्याने पानवठ्यावर येणारा प्राणी मचानावरून सहज टिपता येतो. तसेच वैशाख पोर्णिमेचा दिवसही तुलनेने अधिक उष्ण राहत असल्याने या रात्रीला वन्यजीव पाणी पिण्यासाठी रात्रीच्या वेळी पानवठ्यावर येण्याची शक्यता अधिक असते. वन विभागाने प्राणी प्रगणनेकरिता काटेपूर्णा अभयारण्यातील घारीचा आसोळा, बेरूचा घाट, पांडव लेणी, चाका पॉईंट, चौफुला, बिबट्याची खिंड या वन्यजिवांना आकर्षित करणाऱ्या भागात ठराविक उंचीवर लाकडी व लोखंडी मचान तयार केले होते. त्यावर बसून वन्यजिवप्रेमी व वनपर्यटकांनी विविध वन्यप्राण्यांना जवळून पाहण्याचा अनुभव घेतला.
पानवठ्यांभोवती उभे केले लाकडी मचान
सुमारे ६५०० हेक्टर क्षेत्रात काटेपूर्णा अभयारण्य वसलेला असून उत्तरेस नैसर्गिक जलाशय आहे; मात्र पुर्वेकडे त्याची उणिव असल्याने वनविभागाने ठिकठिकाणी कृत्रीम पानवठे तयार केले आहेत. याच पानवठ्याभोवती वन्यप्रेमींना प्राण्यांच्या नोंदी घेण्यासाठी ठराविक उंचीवर लाकडी मचान तयार करण्यात आले आहेत.
वृक्षसंपदा, प्राणी, पक्ष्यांनी नटलेले काटेपूर्णा
वृक्षसंपदा, जैवविविधतेने नटलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात बिबट, आस्वल, चौसिंगा, काळवीट, नीलगाय, चितळ, रानडुक्कर, सायाळ, खोपळ, रानकुत्रे, सांबर या प्राण्यांसह हरियाल, नौरंग, सर्पगरुड, सातभाई, रातवा, खंड्या, चंडोल, घार, तुरेवाला सर्पगरुड, टकाचोर, तांबट आदी पक्ष्यांच्या प्रजाती पाहावयास मिळतात.