जिल्ह्यात जनावरांचे लसीकरण लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:39 AM2021-05-15T04:39:23+5:302021-05-15T04:39:23+5:30
दरवर्षी विशेषत: पावसाळ्यात घटसर्प, एकटांग्या, लाळ्या खुरकूत, फऱ्या, तोंडखुरी, पायखुरी, पीपीआर आदी स्वरूपातील संसर्गजन्य आजार बळावतात. या आजारांमुळे वेळप्रसंगी ...
दरवर्षी विशेषत: पावसाळ्यात घटसर्प, एकटांग्या, लाळ्या खुरकूत, फऱ्या, तोंडखुरी, पायखुरी, पीपीआर आदी स्वरूपातील संसर्गजन्य आजार बळावतात. या आजारांमुळे वेळप्रसंगी पशु दगावण्याचीही शक्यता असते. तसेच पाळीव प्राण्यांच्या दुधावरही परिणाम होतो. त्यामुळे जनावरांचे पावसाळ्यापुर्वी लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यानुसार, जिल्ह्यात दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, बैल आदी पशुंच्या लसीकरणाची मोहीम हाती घेतली जाते; मात्र यावर्षी अद्याप पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहीम हाती घेतलेली नाही. यामुळे प्रश्न गंभीर झाला असून पशुपालक हैराण झाले आहेत. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवून लसीकरण मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी जिल्हाभरातील पशुपालकांमधून होत आहे.
..............
बाॅक्स :
दरवर्षी मे महिन्यात राबविली जाते लसीकरण मोहीम
जनावरांचे संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण व्हावे, यासाठी वर्षातून दोनवेळा (मे आणि नोव्हेंबर) लसीकरण मोहीम राबविण्यात येते. गतवर्षी दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीमेस एक महिना विलंबाने सुरूवात झाली. चालूवर्षी मे महिन्यात मोहिमेस सुरुवात होणे अपेक्षित असताना अद्याप सुरुवात झालेली नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
.................
बाॅक्स :
लसीकरणाबाबत ‘रासप’चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कोरोनाच्या संकटकाळात पशुसंवर्धन विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे जनावरांच्या लसीकरण मोहीम थांबली आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये जनावरांना तोंडखुरी व पायखुरी हा संसर्गजन्य आजार जडत असताना उपचाराअभावी जनावरे दगावण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे तातडीने लसीकरण मोहीम हाती घ्यावी; अन्यथा ठिय्या आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी योगेश नप्ते पाटील, राधेश्याम कष्टे, प्रभाकर गावंडे व उमेश मस्के यांनी केली आहे.
...............
कोट :
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळेच यंदा जनावरांच्या लसीकरण मोहिमेस विलंब झाला आहे. पुढील आठवड्यापासून मात्र ही मोहीम हाती घेण्याचे नियोजन आहे. त्यानुषंगाने प्रथम पावसाळ्यात उद्भवू शकणाऱ्या आजारांपासून जनावरांचे लसीकरण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात विविध स्वरूपातील १ लाख २० हजार लसींची गरज असून दुसऱ्या टप्प्यात २ लाख ७० हजार लस आवश्यक असल्याची मागणी वरिष्ठांकडे नोंदविण्यात आली आहे.
- भुवनेश बोरकर
उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, वाशिम