अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी अर्ज मागविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:29 AM2021-09-02T05:29:11+5:302021-09-02T05:29:11+5:30
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने मातंग समाजातील युवक व नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी ...
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने मातंग समाजातील युवक व नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा मातंग समाज व त्यातील १२ पोटजातींपैकी असावा. वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे आहे. कर्ज प्रकरणासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, आधार कार्ड यासह महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन वाशिम येथे कर्ज प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन गाभणे यांनी केले.
०००००
५० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट
बीज भांडवल योजनेतून ५० हजार रुपये ते ५ लाख रुपयांपर्यंतच्या १० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. यामध्ये महामंडळाचा सहभाग २० टक्के, बँकेचे कर्ज ७५ टक्के व ५ टक्के लाभार्थी सहभाग असणार आहे. महामंडळाच्या बीज भांडवल रकमेवर ४ टक्के व्याजदर व बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेचा व्याजदर राहील. अनुदान योजनेअंतर्गत ४० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज प्रस्ताव बँकेला पाठविले जातात. त्यामध्ये महामंडळाचे १० हजार रुपये अनुदान व ४० हजार रुपये बँक कर्जाचा समावेश आहे.