घरकुल लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा २० हजाराने वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 03:13 PM2018-10-03T15:13:08+5:302018-10-03T15:13:49+5:30
वाशिम : राज्यातील रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींची उत्पन्न मर्यादा एक लाखाऐवजी १.२० लाख अशी करण्यात आली असून, या नवीन निकषानुसार पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळणार आहे.
वाशिम : राज्यातील रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींची उत्पन्न मर्यादा एक लाखाऐवजी १.२० लाख अशी करण्यात आली असून, या नवीन निकषानुसार पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळणार आहे.
सामाजिक, आर्थिक जात जनगणना २०११ नुसार प्राधान्य क्रम यादीतील लाभार्थींना पंतप्रधान आवास ग्रामीण योजनेचा लाभ दिला जातो. प्रधानमंत्री आवास योजनेतून(ग्रामीण) वगळलेली; परंतू ज्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न १० हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा अनुसूचित जातीतील लाभार्थींना रमाई घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे. रमाई आवास योजनेचा (ग्रामीण) लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाख रुपये असल्याने सदर योजनेंतर्गतचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात व लाभार्थी निवडीमध्ये अडचणी येत असल्याने वार्षिक उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याची मागणी समोर आली. सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने १ आॅक्टोबर रोजी वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाखावरून १.२० लाख रुपये अशी केली असून, त्या अनुषंगाने अनु. जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थींकडून घरकुलासाठी प्रक्रिया राबविली जाणार आहे. वार्षिक उत्पन्न मर्यादेमुळे यापूर्वी घरकुलाचा लाभ घेऊ न शकणाऱ्या अनु. जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थींना आता या नव्या निकषानुसार घरकुलाचा लाभ मिळणार आहे.
शासन नियमानुसार वाशिम जिल्ह्यात रमाई आवास योजनेची अंमलबजावणी केली जाईल. पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.
- दीपक कुमार मीना,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम.