वाशिम जिल्ह्यात आणखी २१ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या २७४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 11:30 AM2020-07-15T11:30:28+5:302020-07-15T11:30:47+5:30
मंगळवार १४ जुलै रोजी दिवसभरात एकूण २१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात शहरांसह ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर सुरूच असून, मंगळवार १४ जुलै रोजी दिवसभरात एकूण २१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आता एकूण रुग्णसंख्या २७४ झाली असून, यापैकी १५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, १४ जुलै रोजी पाच जयांनी कोरोनावर मात केली.
जुलै महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी प्राप्त अहवालानुसार त्यात आणखी २१ जणांची भर पडली. दुपारी २ वाजता प्राप्त अहवालानुसार, कारंजा शहरातील माळीपुरा परिसरातील ३ व्यक्ती तसेच मालेगाव शहरातील शेलू फाटा परिसरातील १, नागरतास रोड परिसरातील १ अशा एकूण ५ व्यक्तींचे कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सायंकाळी ६.३० वाजता प्राप्त अहवालानुसार एकूण १६ जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये मंगरूळपीर शहरातील मंगलधाम परिसरातील ३, संभाजी नगर परिसरातील २, गवळीपुरा परिसरातील २, पंचशील नगर परिसरातील १, चिखली (ता. मंगरूळपीर) येथील ६ व्यक्ती तसेच वाशिम शहरातील गोटे कॉलेज परिसरातील २ व्यक्तींचे कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्वजण यापूर्वीच्या कोरोना बाधितांच्या संपर्कातील आहेत.
पाच जणांना डिस्चार्ज
एकिकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील वाढत असल्याचे दिसून येते. १४ जुलै रोजी एकूण पाच जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये मालेगाव तालुक्यातील दोन, मंगरूळपीर, रिसोड व वाशिम तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत ११२ जणांनी कोरोनावर मात केली.
१५० नमुन्यांकडे लक्ष
कोरोनाबाधित रुग्णांच्या हाय-रिस्क संपर्कातील संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले जातात. जवळपास १५० जणांच्या स्वॅब नमुन्यांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
१५५ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत एकूण २७४ पॉझिटिव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ७ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ११२ आहे, तर सद्यस्थितीत १५५ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.