आणखी २३ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ८०७ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 11:33 AM2020-08-07T11:33:18+5:302020-08-07T11:33:27+5:30
आणखी २३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे गुरूवार, ६ आॅगस्ट रोजी स्पष्ट झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून आणखी २३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे गुरूवार, ६ आॅगस्ट रोजी स्पष्ट झाले. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८१३ झाली आहे.
जिल्ह्यात मेडशी येथे पहिला कोरोनाबाधीत रुग्ण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला होता. जुलै महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्या वाढीचा वेग आॅगस्ट महिन्यात अधिकच वाढला असून, यामध्ये ६ आॅगस्ट रोजी आणखी २३ रुग्णांची भर पडली. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन दिवसातच कोरोनाबाधिताच्या आकड्याने ७०० चा टप्पा ओलांडला. त्यानंतरच तीन दिवसात शंभरावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आता हा आकडा ८१३ वर पोहचला. बुधवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील सुदर्शन नगर परिसरातील ८, टिळक चौक परिसरातील १, मंगरूळपीर शहरातील शिवाजी नगर परिसर ३, तहसीलदार कार्यालय परिसर ४, कवठळ येथील १ असे एकूण १७ कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार रिसोड तालुक्यातील हराळ येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथील ५ अशा एकूण ६ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. आता एकूण रुग्णसंख्या ८१३ झाली असून, १७ जणांचा मृत्यू, एकाची आत्महत्या तर ४७० लोक बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आता ३२५ जणांवर जिल्हा उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
पाच जणांची कोरोनावर मात
बुधवारी जिल्ह्यातील एकूण पाच जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये मालेगाव शहरातील शिक्षक कॉलनी येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील १, नांदगाव येथील १, मानोरा तालुक्यातील गिरोली येथील १ आणि कारंजा लाड तालुक्यातील मोहगव्हाण येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ४७० जणांनी कोरोनावर मात केली.