वाशिम जिल्ह्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ६८ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 10:49 AM2020-06-19T10:49:16+5:302020-06-19T10:49:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढतच असून, गुरूवार १८ जून रोजी प्राप्त १५ अहवालांपैकी एक जण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढतच असून, गुरूवार १८ जून रोजी प्राप्त १५ अहवालांपैकी एक जण कोरोना पॉझिटिव्ह तर उर्वरीत १४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६८ झाली असून, दोघांचा मृत्यू तर १२ जणांनी कोरोनावर मात केल्याने एकूण ५४ रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे एप्रिल महिन्यात आढळला होता. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मात्र जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. परराज्य, परजिल्ह्यातून जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरीक परतत असून, यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. परराज्य, परजिल्ह्यातून परतणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी सरकारी रुग्णालयांत केली जात आहे. सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असणाºया संदिग्ध रुग्णांना तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. या संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्याची व्यवस्थाही तालुकास्तरावरच करण्यात आली. १६ व १७ जून रोजी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी १८ जून रोजी अहवाल प्राप्त झाले. यापैकी आसेगाव पेन (ता. रिसोड) येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. सदर महिलेला ‘सारी’ची लक्षणे असल्याने जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उर्वरित १४ अहवाल निगेटिव्ह आहेत.
८३८ पैकी ७४६ नमुने निगेटिव्ह; ६६ पॉझिटिव्ह
आतापर्यंत ८३८ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ६६ पॉझिटिव्ह तर ७४६ अहवाल निगेटिव्ह आले. २७ अहवालांची प्रतिक्षा आहे. दुसरीकडे बाहेरच्या ठिकाणी पॉझिटिव्ह अहवालाची नोंद असलेले; परंतू वाशिम येथे उपचार घेतलेले दोन रुग्ण असल्याने एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ६८ अशी आहे. यापैकी दोघांचा मृत्यू तर १२ जणांना डिस्चार्ज दिल्याने आता ५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दोन जणांची कोरोनावर मात
जिल्ह्यातील दोन रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना १८ जून रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उपचार घेत असलेल्या ५४ रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
४कारंजा येथील कोरोनाबाधित ५७ वर्षीय महिलेवर अकोला येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान १७ जून रोजी या महिलेचा अकोल्यात मृत्यू झाला.