अनसिंग, वाशिमच्या केंद्रावरील तूर मोजणी वांध्यात!
By admin | Published: May 1, 2017 02:10 AM2017-05-01T02:10:33+5:302017-05-01T02:10:33+5:30
दोन्ही ठिकाणी मिळून १० हजार क्विंटल: शेतकऱ्यांच्या यादीत चुका
मंगरुळपीर - नाफेडची खरेदी २२ एप्रिलपासून नाफेडची तूर खरेदी बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बाजार समितीच्या ओट्यांवरील शिल्लक तुरीचे पंचनामे तीन दिवसांपूर्वी करण्यात आले; परंतु मंगरुळपीर वगळता इतर ठिकाणची मोजणी अद्यापही सुरू झाली नाही. त्यातच बाजार समितीच्या ओट्यावर असलेली तूर आणि प्रत्यक्षात बाजार समितीने सादर केलेली शेतकऱ्यांची यादी यात मेळ नसल्याने येथील तूर मोजणी वांध्यातच आली आहे. जिल्ह्यात
नाफेडद्वारे तूर खरेदी बंद करण्यात आली असली, तरी जिल्ह्यातील सहाही शासकीय खरेदी केंद्रावर हजारो क्विंटल तूर पडून आहे. यात वाशिम आणि अनसिंग येथील बाजार समितीचाही समावेश आहे. नाफेडची खरेदी बंद झाल्यानंतर केव्हा सुरू होणार, याबाबतची स्थिती अद्याप अधांतरीच आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सहाही नाफेड केंद्रावर पडून असलेल्या ४१ हजार क्विंटल तूरीच्या शासकीय पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे तुरीची मोजणी सुरु होणे अपेक्षीत होते. त्यासाठी वाशिम बाजार समितीने शेतकऱ्यांची यादी तयारकेली; परंतु ही बाजार समितीकडील यादी आणि बाजाराच्या ओट्यावर असलेल्या तूर उत्पादकांच्या नावात तफावत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नेमकी तूर मोजावी कशी हा प्रश्न उपस्थित झाला. त्यातच पूर्वी नाफेडच्या केंद्रावर साडे तीन हजार क्विंटल तूर शिल्लक असताना पंचनाम्यानंतर ती सहा हजार क्विंटल असल्याचे दिसले. त्यामुळे तुरीच्या प्रमाणासह शेतकऱ्यांच्या नावात फरक निर्माण झाल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. आता रविवार आणि सोमवारही सुटी असल्याने नाफेडच्या केंद्रावरील तुरीची मोजणी मंगळवारपर्यंत होऊ शकणार नसल्याचे नाफेडच्या मोजणी केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.