ई-पीक पाहणीत सहभागी होण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:49 AM2021-09-17T04:49:45+5:302021-09-17T04:49:45+5:30
............... आरोग्य विभागाचा लसीकरणावर भर वाशिम : कोरोना संसर्गाने बाधित आढळणाऱ्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत झपाट्याने खालावले आहे. असे ...
...............
आरोग्य विभागाचा लसीकरणावर भर
वाशिम : कोरोना संसर्गाने बाधित आढळणाऱ्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत झपाट्याने खालावले आहे. असे असले तरी संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या कोरोना लसीकरणावर विशेष भर दिला जात आहे. त्यानुषंगाने कोविशिल्डचे ३५ हजार व कोव्हॅक्सिनचे १८ हजारांवर डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अविनाश आहेर यांनी दिली.
................
वाढत्या महागाईने महिलावर्ग त्रस्त
वाशिम : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. चालू महिन्यात १ सप्टेंबरपासून पुन्हा त्यात २५ रुपयांनी वाढ करण्यात आली. यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले असून, विशेषत: महिला अधिक त्रस्त झाल्या आहेत. विद्यमान शासनाने सिलिंडरचे दर कमी करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे.
................
ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेला प्रतिसाद
वाशिम : हरित क्रांतीचे प्रणेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १००व्या स्मृतिदिनानिमित्त अखिल भारतीय तांडा सुधार समितीने ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून याअंतर्गत उपक्रम राबविण्यात येत असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समितीचे महासचिव नामा बंजारा यांनी गुरूवारी दिली.
.................
अनुकूल वातावरण; सोयाबीन बहरले
वाशिम : चालू वर्षी समाधानकारक पाऊस आणि पोषक वातावरण असल्याने खरिपातील सर्वच पिकांची स्थिती तुलनेने उत्तम असल्याचे दिसून येत आहे. कपाशी आणि सोयाबीनचे पीकही चांगलेच बहरले आहे. त्यामुळे यंदा चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
...............
कामगारांची कपात थांबविण्याची मागणी
वाशिम : महापारेषणमध्ये कार्यरत तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या कंत्राटी कामगारांची कपात करण्याचे धोरण वरिष्ठ स्तरावरून अवलंबिण्यात आले आहे. यामुळे अनेकजण बेरोजगार होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, यासंदर्भातील आदेश वरिष्ठांनी तत्काळ मागे घ्यावा आणि कंत्राटी कामगारांची कपात थांबवावी, अशी मागणी तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार संघटनेकडून करण्यात आली.
................
रस्त्यांच्या दुरूस्तीचा प्रश्न प्रलंबित
वाशिम : शहरातील तहसील कार्यालयाकडून श्रावस्ती नगरमार्गे जुन्या आययुडीपी काॅलनीला जोडल्या जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. स्थानिक नगर परिषदेने रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून वेळोवेळी करण्यात आली. मात्र, हा प्रश्न अद्याप प्रलंबित असून, नागरिकांना यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे.
...............
कोंडवाड्यासंबंधीची मागणी बेदखल
वाशिम : शहरातील पाटणी चाैक ते राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, शिवाजी चाैक, अकोला नाका आदी मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरे दैनंदिन ठिय्या मांडून बसत आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन बंद असलेला कोंडवाडा सुरू करावा, अशी मागणी माळी युवा मंचने काही दिवसांपूर्वी केली. मात्र, त्यावर अद्याप कुठलाच निर्णय झाला नाही.