कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांनी तातडीने अर्ज करावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 01:07 AM2017-09-06T01:07:40+5:302017-09-06T01:08:01+5:30

राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांनी याची नोंद घेऊन तातडीने अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Applicants should immediately apply for loan free loan! | कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांनी तातडीने अर्ज करावे!

कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांनी तातडीने अर्ज करावे!

Next
ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचे आवाहनअंतिम मुदत नऊ दिवसांवर४६ हजार शेतकर्‍यांची केवळ नाव नोंदणी!

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम: राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांनी याची नोंद घेऊन तातडीने अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. ज्या शेतकर्‍यांनी केवळ नाव नोंदणी केली आहे, त्यांचे ऑनलाइन अर्ज भरले गेल्याशिवाय त्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याने संबंधित शेतकर्‍यांनीही ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून अर्ज भरला गेल्याची खात्री करावी, असेही जिल्हा प्रशासनाने मंगळवारी कळविले. 
ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत स्तरावर आपले उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी सर्वप्रथम अर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांची नाव नोंदणी करून घेण्यात येते. त्यानंतर ऑनलाइन अर्ज भरले जातात. ऑनलाइन अर्ज भरताना संबंधित शेतकरी पती-पत्नी दोघेही, त्यांचे आधार कार्ड, मोबाइल क्रमांकासह उपस्थित असणे आवश्यक आहे. तसेच कर्जदार शेतकर्‍यांचे कर्ज खाते क्रमांक, बचत खाते क्रमांक आदी माहिती अर्जामध्ये भरणे बंधनकारक आहे. 
ऑनलाइन अर्ज भरण्यामध्ये काही अडचणी असल्यास आपले सरकार सेवा केंद्राचे संजय यादव (भ्रमणध्वनी क्रमांक : ९३७३३७५४६७), ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्राचे सुनील देशमुख (भ्रमणध्वनी क्रमांक : ७५८८६७८४७४), महा ई-सेवा केंद्राचे सागर भुतडा (भ्रमणध्वनी क्रमांक : ९८५0३७१६७१) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

४६ हजार शेतकर्‍यांची केवळ नाव नोंदणी!
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५९ हजार १३0 शेतकर्‍यांनी विविध केंद्रांवर नाव नोंदणी केलेली आहे. यापैकी १ लाख १३ हजार १३४ शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नाव नोंदणी झाल्यानंतरही आवश्यक कागदपत्रे नसल्याने किंवा शेतकरी पती-पत्नी हजर नसल्याने उर्वरित ४५ हजार ९९६ शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरले गेलेले नाहीत. या शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरले गेल्याशिवाय त्यांना कर्जमाफी अथवा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार नसल्याने संबंधित शेतकर्‍यांनी त्वरित नजीकच्या महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपले ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच सर्व शेतकर्‍यांनी आपला अर्ज परिपूर्ण भरला गेल्याची खात्री करून घ्यावी, तसेच अर्ज भरल्याची पावती प्राप्त करून घ्यावी, असे प्रशासनाने कळविले आहे. 
-

Web Title: Applicants should immediately apply for loan free loan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.