तलाठी व मंडळ अधिका-यांनी दिले सामूहिक रजेचे अर्ज !
By admin | Published: November 18, 2016 02:22 AM2016-11-18T02:22:43+5:302016-11-18T02:22:43+5:30
मालेगाव तहसील अधिकारी यांच्याकडे केले अर्ज सादर.
मालेगाव, दि. १७- तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मागण्या मान्य न झाल्याने १७ नोव्हेंबरपासून सर्व जण सामूहिक रजेवर गेले आहेत. तहसीलदारांना सामूहिक रजेचे अर्ज दिले आहेत.
प्रलंबित असलेल्या विविध मागण्या निकाली काढण्याची मागणी तलाठी व मंडळ अधिकार्यांनी शासनाकडे केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांमार्फत शासनाकडे निवेदन दिले. मालेगाव तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांनी यापूर्वी २६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले होते. याचवेळी मागण्या मान्य न झाल्यास १७ नोव्हेंबरपासून सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला होता. मागण्या मान्य न झाल्याने आंदोलनाला सुरुवात केली. ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान काळ्या फिती लावून तलाठी व मंडळ अधिकार्यांनी आंदोलन केले.
तलाठी साजा व महसूल मंडळाची पुनर्रचना करण्यात यावी, संगणीकृत सात बारामधील वेबसाइटच्या कनेक्टिव्हिटीची अडचण दूर करावी, प्रत्येकाला लॅपटॉप व प्रिंटर देण्यात यावे, पायाभूत प्रशिक्षण देण्यात यावे, अवैध गौण खनिजबाबत निश्चित धोरण ठरविण्यात यावे, प्रत्येक गावात कार्यालयाची सोय करावी, पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धत वापरावी, यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी सदर आंदोलन करण्यात येत आहे. १७ नोव्हेंबरपासून सर्व तलाठी व मंडळ अधिकारी सामूहिक रजेवर गेले आहेत. मालेगाव तहसील येथील ४४ तलाठी व ८ मंडळ अधिकारी आंदोलनात सहभाग झाले आहेत.