पोहरादेवी विकास आराखड्याला मंजुरी !
By Admin | Published: July 10, 2017 08:12 PM2017-07-10T20:12:31+5:302017-07-10T20:12:31+5:30
पहिल्या टप्प्यात २५ कोटींचा निधी : विविध कामे प्रस्तावित
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास राज्य शासनाच्या उच्चाधिकारी समितीने शुक्रवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. त्यानुसार या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीन विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने सोमवारी दिली.
पोहरादेवी या तिर्थक्षेत्राचा सर्वांगीन विकास करण्याची ग्वाही राज्य शासनाने दिली होती. त्यानुसार हा विकास आराखडा बनविला होता. राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीमध्ये ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्यासह सबंधित विभागांचे मंत्रालयस्तरीय अधिकारी उपस्थित होते. तसेच वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. बैठकीला वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर उपस्थित होते. यावेळी पोहरादेवी विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणानंतर उच्चाधिकार समितीने पोहरादेवीच्या तिर्थस्थळासाठी २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी दिली. या निधीतून भक्त निवास, खुले सभागृह, संग्रहालय, अंतर्गत रस्ते, परिसराला संरक्षण भिंत व प्रवेशद्वार, सुशोभीकरण व इतर अनुषंगिक बाबींची कामे प्रस्तावित आहेत.