मानोरा तालुक्यात नियम डावलून घरकुलांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 02:17 PM2018-03-26T14:17:24+5:302018-03-26T14:17:24+5:30
आसोला खुर्द: रमाई घरकूल आवास योजनेंतर्गत खऱ्या लाभार्थींना वंचित ठेवत नियमांना डावलून पक्की घरे असणाऱ्यांना घरकुल मंजूर करण्यात येत असल्याचा प्रकार सुरू आहे.
आसोला खुर्द: रमाई घरकूल आवास योजनेंतर्गत खऱ्या लाभार्थींना वंचित ठेवत नियमांना डावलून पक्की घरे असणाऱ्यांना घरकुल मंजूर करण्यात येत असल्याचा प्रकार सुरू आहे. पंचायत समिती प्रशासनाने या प्रकाराची दखल घेऊन संबंधित दोषींवर कारवाई करावी, तसेच पात्र लाभार्थींना घरकूल मंजुर करावे, अशी मागणी आसोला खुर्द येथील ग्रामस्थांनी मानोरा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या तक्रारीची दखल न घेतल्यास 31 मार्चपासून उपोषण करण्याचा ईशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
मानोरा तालुक्यात रमाई घरकूल योजना राबविण्यात येत असून, शेकडो कुटूंबांनी या योजनेंतर्गत अर्ज सादर केले आहेत. या अर्जानुसार पाहणी करून पात्र लाभार्थींना घरकूल मंजूर करणे आवश्यक आहे; परंतु या योजनेत नियमांना बगल देऊन खऱ्या लाभार्थींना वंचित ठेवण्याचा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी गटविकास गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या आहेत. यात आसोला खुर्द येथील अर्जदारांचाही समावेश आहे. आसोला खुर्दसाठी रमाई घरकूल योजनेंतर्गत घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे; परंतु त्यामधील काही घरकुलांना अद्यापही मंजुरी मिळालेली नसून, काही ठिकाणी पक्की घरे असणाºयांना घरकूल मंजुर करण्यात आली असल्याचे गटविकास अधिकाºयांकडे केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीची प्रत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यां कडेही पाठविण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेऊन अधिकाऱ्यां नी सदर प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी आणि नियमांना बगल देणाºयांवर कारवाई करण्यासह पात्र लाभार्थींना न्याय द्यावा, अशी मागणी लाभार्थींच्यावतीने करण्यात आली आहे.