ऑनलाईन शिक्षणामुळे गरीब विद्यार्थ्यांची पंचाईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 04:47 PM2020-08-02T16:47:20+5:302020-08-02T17:18:03+5:30
गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चित्र कारंजा तालुक्यात पाहायला मिळत आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
कारंजा (वाशिम): कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर यंदाचे शैक्षणिक सत्र अद्यापही पूर्णपणे सुरू झाले नाही. त्यात खासगी शाळांनी ऑनलाईन पद्धतीचा आधार घेतला; परंतु गरीब विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन घेण्याएवढी रक्कम नसतानाच शाळांकडून अतिरिक्त शुल्कही वसूल करण्याचा प्रकार होत असल्याने गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चित्र कारंजा तालुक्यात पाहायला मिळत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे शिक्षणावर परिणाम होत आहे. शासनाने शाळा सुरू करण्याबाबत अद्यापही निर्देश दिले नाहीत. त्यामुळे शासकीय शाळा बंदच आहेत. काही खासगी शाळा ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करीत आहेत; परंतु ऑनलाईन पद्धतीच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क वसुली करण्याचा प्रकार कारंजात पाहायला मिळत आहे. त्यातच गरीब विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन घेऊन देण्याची ऐपत पालकांची नसल्याने गरीब विद्यार्थी शिक्षणात मागे पडत आहेत. काही शाळांना शासनाकडून शंभर टक्के अनुदान मिळत असतानही कारंजा शहरातील नामांकीत शाळा अद्यापही डोनेशनचा अट्टाहास करीत असल्याची तक्रार पालकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीच्या शिक्षणात विद्यार्थ्यांना अध्ययन आणि शाळेसाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा अधिक वेळ ऑनलाईनच्या अभ्यासात गुतूंन राहावे लागत असून, काही शाळांकडून सकाळी ७.२५ पासून मधल्या काळातील अर्धातास वगळता ११ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना स्मार्ट फोनवर अध्ययनासाठी गुंतवून ठेवले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होणाºयाची शक्यता निर्माण झाली आहे. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने याची चौकशी करण्याची मागणी पालक करीत आहेत.
कारंजातील शाळा विद्यार्थ्यांकडून डोनेशन घेत असल्याची कोणतीही तक्रार आमच्याकडे अद्याप आली नाही. पालकांनी न घाबरता आमच्याकडे तक्रार करावी, तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित शाळेची चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
-सुरेश अघडते,
गटशिक्षणाधिकारी,
पंचायत समिती कारंजा लाड