टाळ-मृदंगाच्या गजरात माकडावर अंत्यसंस्कार!
By admin | Published: June 10, 2017 02:15 AM2017-06-10T02:15:15+5:302017-06-10T02:15:15+5:30
माणुसकीचा प्रत्यय; राजुरा ग्रामस्थांचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा (वाशिम ): आजारी अवस्थेतील माकडाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ८ जून रोजी राजुरा येथे घडली. यावेळी गावकर्यांनी माणुसकीचा प्रत्यय देत चक्क टाळ-मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढून माकडावर अंत्यसंस्कार केले.
गावाला टँकरने पाणीपुरवठा करणारे शे. रहीम शे. गबरू यांना रिधोरा ते राजुरा मार्गावर एक माकड आजारी अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. त्यांनी आपले वाहने उभे करून पादचारींच्या मद तीने माकडाला राजुरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात भरती केले. तेथे सदर माकडावर पशुधन पर्यवेक्षक डॉ. सतीश देवळे, कर्मचारी जगदीश सोनोने यांनी उपचार करून माकडाला जीवदान देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र त्यात त्यांना यश आले नाही. उपचारादरम्यान माकडाचा मृत्यू झाला. ही बाब गावकर्यांना कळताच युवा मल्हार सेनेचे तालुकाध्यक्ष नागेश गावंडे यांनी पुढाकार घेत माकडावर विधिवत अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेतला. विठ्ठल महाराज सोनोने, गजानन महाराज टोंचर, झ्याटे महाराज यांनी टाळ आणि मृदंगाच्या गजरात माकडाची अंत्ययात्रा काढून स्मशानभूमीत अंतिम संस्कार पार पाडले. यावेळी बजरंग दलच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.