वाशिम जिल्ह्यात भुईमुगाचे क्षेत्रफळ दुप्पट

By admin | Published: March 22, 2017 01:06 PM2017-03-22T13:06:02+5:302017-03-22T13:06:02+5:30

जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाले आहे.

The area of ​​groundnut is doubled in Washim district | वाशिम जिल्ह्यात भुईमुगाचे क्षेत्रफळ दुप्पट

वाशिम जिल्ह्यात भुईमुगाचे क्षेत्रफळ दुप्पट

Next

वाशिम: पोषक वातावरण आणि मुबलक पाणीसाठ्याचा आधार असल्यामुळे जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाले आहे. तथापि, इतर उन्हाळी पिकातील मुग आणि तीळाचे क्षेत्र मात्र मोठ्या प्रमाणात घटल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात गतवर्षी ३ हजार ३७४.५५ हेक्टर क्षेत्रावर भुईमुगाची पेरणी झाली होती, तर यंदा तब्बल ८ हजार ४५२ हेक्टवर उन्हाळी भुईमुगाची पेरणी करण्यात आली आहे.
मागील तीन वर्षे शेतकऱ्यांना अवर्षण आणि दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे उन्हाळी पिकेच काय, तर खरीप आणि रब्बी हंगामातही पेरणी क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले होते. यंदा पावसाने चांगली साथ दिली. त्यामुळे खरीप आणि रब्बीसह उन्हाळी पिकांचे क्षेत्रही वाढले. त्यात प्रामुख्याने उन्हाळी भुईमुग या पिकाचा उल्लेख करावा लागेल. पावसाचे प्रमाण अल्प असल्याने भूगर्भातील पाणी पातळी दीड मीटरने खालावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी आणि कूपनलिका आटल्या होत्या. त्यामुळे भुईमुगासारख्या पिकाची पेरणी करून अतिरिक्त जोखीम पत्करण्याचे शेतकऱ्यांनी टाळले. यंदा मात्र जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. यंदा जिल्ह्यात रब्बीच नव्हे, तर उन्हाळी पिक पेरणी क्षेत्रही वाढले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात उन्हाळी मका, तीळ, ज्वारी, सूर्यफूल आणि भुईमूग मिळून ४ हजार ७३६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यामध्ये मका ४७१ हेक्टर, सूर्यफुल २४, तीळ ४३.५० हेक्टर, मुग ३८५.५० हेक्टर, भुईमूग ३ हजार ३७४ हेक्टर आणि इतर पिके ४३७.९० हेक्टरवर पेरण्यात आली होती. आता या वर्षी केवळ भुईमुगाची पेरणीच ८ हजार ४५२ हेक्टरवर करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या एकूण उन्हाळी पिकांच्या क्षेत्रापेक्षा हे प्रमाण दुप्पट आहे. यंदा उन्हाळी ज्वारी आणि उडिदाची पेरणीही शेतकऱ्यांनी केली आहे. यंदाच्या उन्हाळी पिकांत ज्वारी १४० हेक्टर, उन्हाळी मका १४० हेक्टर, उडिद १२२ हेक्टर, मूग ४३६ हेक्टर, तर भुईमूगाची पेरणी ८ हजार ४५२ हेक्टवर झाली आहे.

मका, सुर्यफुलालादेखील पसंती नाही
मागील तीन वर्षे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने जलसाठा पुरेसा नसतानाही उन्हाळी मका या पिकाची पेरणी ४७१ हेक्टरवर झाली होती. ती यंदा केवळ १४० हेक्टवर क्षेत्रावर मर्यादित झाली आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २४ हेक्टर क्षेत्रावर सुर्यफुलाची पेरणी केली होती; परंतु यंदा मात्र पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही केवळ एका हेक्टरवर सुर्यफुलाची पेरणी करण्यात आली आहे. मागील वर्षी ज्वारी आणि उडिदाची पेरणी शेतकऱ्यांनी केली नव्हती; परंतु यंदा मात्र ज्वारीची पेरणी १४० हेक्टर, तर उडिदाची पेरणी १२२ हेक्टरवर झाली आहे.

Web Title: The area of ​​groundnut is doubled in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.